सोयाबिनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी केला चक्काजाम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 18:45 IST2016-11-07T18:45:04+5:302016-11-07T18:45:04+5:30
सोयाबिनला अपेक्षित दर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी व्यापारी व शासनाच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारला.

सोयाबिनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी केला चक्काजाम !
ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड, दि. 7 - सोयाबिनला अपेक्षित दर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी व्यापारी व शासनाच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारला. यादरम्यान रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने या प्रश्नावर तोडगा निघाला.
गत तीन वर्षांपासून शेतकरी सततच्या दुष्काळाने अक्षरश: होरपळत असताना यावर्षी प्रारंभी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, परतीच्या पावसाने थैमान घालून सोयाबिनचे जबर नुकसान झाले.
एकीकडे अशी विदारक परिस्थिती उद्भवली असताना दुसरीकडे शेतमालाचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्याचाच परिणाम सोयाबीनच्या बाजार भावावर झाला असून हमी भावापेक्षाही कमी भावाने सोयाबिन खरेदी केले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्काजाम करून आपला संताप व्यक्त केला.