पावसाअभावी वऱ्हाडात पेरण्या खोळंबल्या
By Admin | Updated: June 30, 2015 02:40 IST2015-06-30T02:40:30+5:302015-06-30T02:40:30+5:30
पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ५० टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे; परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी आता पेरण्या थांबविल्या आहेत.

पावसाअभावी वऱ्हाडात पेरण्या खोळंबल्या
अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ५० टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे; परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी आता पेरण्या थांबविल्या आहेत. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता; तथापि सध्या पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये खरिपाचे एकूण पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ८३ हजार ८०० हेक्टर असून, २९ जूनपर्यंत १६ लाख हेक्टरच्यावर पेरणी पोहोचल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी यंदाही सोयाबीनला पसंती दिल्याने सोयाबीनचे क्षेत्र या विभागात सहा लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
सोयाबीनचा पेरा वाढला
पाच जिल्ह्यांत सुरुवातीला कपाशीने आघाडी घेतली होती. आता सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, शुक्रवारपर्यंत ६ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयबीनचा पेरा केला. कापसाचे क्षेत्रही ४ लाख ८८ हजार १०० हेक्टरच्यावर पोहोचले आहे. मूग २८,९००, उडीद १ लाख ८७ हजार, तर तुरीची १ लाख २५ हजार ७०० हेक्टरच्यावर पेरणी झाली आहे.
पाऊस असमान पाच जिल्ह्यांत १ ते २६ जूनपर्यंत १७८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २६ जूनपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ११८.२ मि.मी., अकोला जिल्हा ११२.७ मि.मी., वाशिम जिल्हा १४२.१ मि.मी., अमरावती जिल्ह्यात १२६.५ मि.मी., तर यवतमाळ जिल्ह्यात १५२.२ एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.