बीबीएफ यंत्राने पेरणी करा : होटकर

By Admin | Updated: July 1, 2016 01:50 IST2016-07-01T01:50:44+5:302016-07-01T01:50:44+5:30

परंपरागत पाभरीऐवजी बीबीएफ म्हणजे ‘ब्रॉड बेस फरो’ या यंत्राच्या साह्याने पेरणी करून आपला वेळ, मजुरी व पैशांची बचत करावी

Sowing the BBF machine: Hot | बीबीएफ यंत्राने पेरणी करा : होटकर

बीबीएफ यंत्राने पेरणी करा : होटकर


राजगुरुनगर : परंपरागत पाभरीऐवजी बीबीएफ म्हणजे ‘ब्रॉड बेस फरो’ या यंत्राच्या साह्याने पेरणी करून आपला वेळ, मजुरी व पैशांची बचत करावी, असे आवाहन खेडचे कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी केले आहे.
खेड तालुक्यात पावसाने काहीशी हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली आहेत. पेरणी करताना ती बीबीएफ या उपकरणाच्या साह्याने केल्यास वेळेची व पैशांची मोठी बचत होते. पेरणी करताना एकाच वेळी बियाणे आणि खते त्यामधून टाकता येतात. तसेच, योग्य अंतरावर बी टाकले जात असल्याने त्यात बचत होते व उत्पन्नातही वाढ होते. तसेच, खतही या यंत्रामुळे खोलवर जाते व पिकाला जास्त फायदा होतो. परंपरागत प्रकारात शेतकरी खत मातीवर पांगवतात; त्यामुळे काही खत वाया जाते. यामुळे काही तासांत पेरणीचे काम पूर्ण होते. पाभरीच्या तुलनेत बीबीएफ पेरणी यंत्र फारच कमी वेळ घेत असल्याने त्या यंत्राने पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. यामुळे हे पेरणी यंत्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. या यंत्राच्या साह्याने बहुतेक पिकांच्या बियाण्याची पेरणी करता येते.
या यंत्राची प्रात्यक्षिके कृषी विभागामार्फत ठिकठिकाणी दाखविली जात आहेत. अनेक शेतकरी ते वापरू लागले आहेत. यामुळे बियाणे आणि खतामध्ये कशी बचत होते, हे दाखविले जात आहे. शेतकऱ्याचा वेळ, मजुरी आणि पैशांची मोठी बचत होत असल्याने शेतकऱ्यांनी या पेरणी यंत्राचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन कृषी अधिकारी होटकर यांनी केले आहे.
हे यंत्र खेड पंचायत समितीत उपलब्ध असून, शेतकऱ्यांना अनुदानावर मिळू शकते. त्याची किंमत ४८,००० रुपये आहे. पण, ५० टक्के अनुदानामुळे हे यंत्र २४,००० रुपयांना मिळू शकते. खेड तालुक्यात भुईमूग आणि सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे.
खेड तालुक्यात २,५०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते, तर सुमारे ७,००० हेक्टरवर भुईमूग घेतला जातो. बीबीएफ या यंत्राने शेतकऱ्यांनी या पिकांची पेरणी केल्यास त्यांच्या फायद्याचे आहे. या यंत्राच्या साह्याने पेरणीला वेळ लागत नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Sowing the BBF machine: Hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.