रिकाम्या बाकांसमोर सूप वाजले!
By Admin | Updated: December 25, 2014 02:06 IST2014-12-25T02:06:17+5:302014-12-25T02:06:17+5:30
हजारो कोटींच्या घोषणा आणि विरोधकांच्या बहिष्कारामुळे रिकाम्या बाकांकडे बघत मंत्र्यांनी दिलेली उत्तरे,

रिकाम्या बाकांसमोर सूप वाजले!
अतुल कुलकर्णी , मुंबई
हजारो कोटींच्या घोषणा आणि विरोधकांच्या बहिष्कारामुळे रिकाम्या बाकांकडे बघत मंत्र्यांनी दिलेली उत्तरे, अशा वातावरणात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदा १३ दिवस चाललेले हे पहिले अधिवेशन ठरले. मात्र विरोधीपक्षानी शेवटच्या दिवशी कामकाजावर पूर्णपणे बहिष्कार टाकून नवाच पायंडा पाडला. मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही म्हणून विरोधकांनी मंगळवारीच बहिष्काराचे अस्त्र उपसले होते.
सभागृहात मंत्र्यांनी उत्तरे द्यायची असतात, प्रश्न विचारायचे नसतात. पण मुंबईवरील लक्षवेधीची चर्चा असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उत्तर देत होते. मात्र ते स्वत:च म्हणाले, माझाही एक प्रश्न आहे! ज्यांची लक्षवेधी आहे ते सदस्य सभागृहात नसतील तर ती चर्चेला घेतली जात नाही; मात्र अन्य सदस्यांना त्यावर बोलायचे आहे , असे सांगत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चर्चा घडवून आणत आणखी एका नव्या प्रथेला जन्म दिला.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य सकाळी विधानभवनात आले मात्र बाहेर माध्यमांशी बोलून त्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. निलंबन मागे घेण्यात आलेले आमदारही आज विधानभवनात आले होते; मात्र बहिष्कारामुळे त्यांना सभागृहात जाता आले नाही. मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आजही दिवसभर सभागृहाबाहेर गाजला. विधानपरिषदेतील विरोधीपक्षाचे सदस्य विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत होते. प्रथेप्रमाणे याहीवर्षी बेळगाव सीमा प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यावर जोरदार चर्चा झाली आणि सरकार सीमा वासियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असे वर्षानुवर्षे चालत आलेले उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.