‘त्या’ ध्वनिचित्रफितीची चौकशी पूर्ण

By Admin | Updated: July 4, 2016 03:43 IST2016-07-04T03:43:52+5:302016-07-04T03:43:52+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे दोन अधिकारी पैसे घेत असल्याच्या ध्वनिचित्रफीत प्रकरणाचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी चौकशीचे आदेश दिले

'That' soundtrack inquiry completed | ‘त्या’ ध्वनिचित्रफितीची चौकशी पूर्ण

‘त्या’ ध्वनिचित्रफितीची चौकशी पूर्ण


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे दोन अधिकारी पैसे घेत असल्याच्या ध्वनिचित्रफीत प्रकरणाचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी चौकशीचे आदेश दिले होते. शनिवारी या चौकशीचा अहवाल रवींद्रन यांना सादर केला असून या प्रकरणी ते आता काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेतील एका कर्मचाऱ्यानेच संबंधित चित्रफीत तयार करत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अंमलबजावणी संचालनालय यांना पाठवून या भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ही चित्रफीत गुरुवारी प्रसारित होताच याची आयुक्त रवींद्रन यांनी गंभीर दखल घेत जलअभियंता अशोक बैले यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमली. त्यांना ४८ तासांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. या चित्रफितीमधील एका भागामध्ये माजी शहर अभियंता पी.के. उगले हे एकाकडून पैसे स्वीकारताना आणि फाइल तपासताना दिसत आहेत, तर दुसऱ्या भागामध्ये कार्यकारी अभियंता दीपक भोसले हे त्यांच्या घरी एकाकडून पैसे आणि फाइल घेताना दिसत आहेत. दरम्यान, या चौकशीचा अहवाल शनिवारी सायंकाळी आयुक्त रवींद्रन यांना सादर करण्यात आला.
यासंदर्भात रवींद्रन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अहवाल मिळाला असून सोमवारी अहवाल तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उगले हे आधीपासूनच रजेवर आहेत, तर भोसले यांना चित्रफीत प्रकरणानंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. अहवालातून काय समोर येते आणि आयुक्त या प्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अन्यथा शिस्तभंगाची कारवाई : विशेष बाब म्हणजे ज्या कर्मचाऱ्याने ही ध्वनिचित्रफीत प्रसारित केली असेल, त्याने ती २४ तासांत पुराव्यासह सुपूर्द करावी, अन्यथा त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे पत्रक आयुक्त रवींद्रन यांनी शुक्रवारी जारी केले आहे. ही ध्वनिचित्रफीत माध्यमांकडे तसेच अन्य वरिष्ठांकडे सोपवण्यापूर्वी प्रथम आयुक्यांच्या निदर्शनास आणणे उचित ठरले असते, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: 'That' soundtrack inquiry completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.