सून म्हणते, पावसासाठी दिला सासऱ्याचा बळी
By Admin | Updated: July 16, 2014 01:12 IST2014-07-16T01:12:23+5:302014-07-16T01:12:23+5:30
‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे हातात कुऱ्हाड असलेली पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती. तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले. घरात जाऊन बघितले तर सासरा रक्ताच्या थारोळ्यात

सून म्हणते, पावसासाठी दिला सासऱ्याचा बळी
गावकऱ्यांपुढे कबुली : नारळी येथील अंध सासऱ्याचे खून प्रकरण
देवानंद पुजारी - फुलसावंगी (यवतमाळ)
‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे हातात कुऱ्हाड असलेली पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती. तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले. घरात जाऊन बघितले तर सासरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. उमरखेड तालुक्यातील नारळी येथे रविवारी रात्री घडलेल्या भीषण घटनेचे वास्तव गावकरी सांगत होते.
प्रस्तुत प्रतिनिधीने नारळी गावाला भेट दिली तेव्हा घटनेचा थरार गावकरी कथन करीत होते. अडीच हजार लोकवस्तीच्या या गावात पंचफुला गणेश राठोड परिवारासह राहते. पती, मुलगा शंकर आणि दक्षता व संतोषी या दोन मुली असा परिवार आहे. सोबतच अंध सासरा वसरामही राहत होता. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता गाव नेहमीप्रमाणे व्यस्त होते. तेवढ्यात रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन पंचफुला घराबाहेर आली. तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरी क्षणभर स्तब्ध झाले. ती गोरमाटी भाषेतून पाऊस येण्याकरिता आपल्या सासऱ्याचा बळी दिल्याचे गावकऱ्यांपुढे म्हणत होती.
ग्रामीण भागात नैसर्गिक आपत्तीत पशुबळी देण्याची प्रथा आहे. गावकऱ्यांनाही नेमके हेच वाटले. परंतु घरात जाऊन पाहिले तर चक्क तिचा अंध असलेला वृद्ध सासरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. काही वेळातच पंचफुलाच्या घरासमोर गर्दी झाली. तिच्या हातून आणखी काही अनिष्ट घडेल म्हणून गावकऱ्यांनी तिला शिताफीने पकडले. कुऱ्हाड ताब्यात घेऊन तिला दोराच्या साहाय्याने निंबाच्या झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर सरपंच सुभाष राठोड यांनी घटनेची माहिती बिटरगाव पोलिसांना दिली.
विशेष म्हणजे, राठोड कुटुंब मूळचे महागाव तालुक्यातील मुडाणा येथील रहिवासी आहे. मात्र २० वर्षापूर्वी पंचफुलाचे मानसिक संतुलन ढळल्याने संपूर्ण कुटुंब नारळी येथे वास्तव्यास आले. दरम्यान नांदेड येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मुलमुले यांच्याकडे पंचफुलावर उपचार करण्यात आले. ती पूर्णपणे बरी झाली. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पंचफुलाचे मानसिक संतुलन पुन्हा ढासळले होते.
आषाढी पौर्णिमेच्या दिवशी परिसरात पावसासाठी पशुबळी दिले जात असल्याचे सांगितले जाते. हा प्रकार पंचफुलाने बघितला असावा. आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली असावी, असा गावकऱ्यांचा कयास आहे.