सोनिया गांधी यांची आज कोल्हापुरात सभा
By Admin | Updated: October 9, 2014 00:52 IST2014-10-09T00:51:40+5:302014-10-09T00:52:06+5:30
मेरी वेदर मैदानावर जय्यत तयारी : अनेक मान्यवर नेते हजर राहणार, कडक पोलीस बंदोबस्त

सोनिया गांधी यांची आज कोल्हापुरात सभा
कोल्हापूर : काल, मंगळवारी झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे गांधी मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सभा उद्या, गुरुवारी कसबा बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानावर सकाळी अकरा वाजता होणार आहे. काल रात्री उशिरा सभेचे मैदान बदलण्याचा निर्णय झाला असून, मेरी वेदर मैदानावर आज, बुधवारी दिवसभर सभेची तयारी सुरू होती.
दिल्ली येथील विशेष सुरक्षा दल (एसपीजी) आणि कोल्हापूर पोलिसांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गांधी मैदानाची पाहणी केली आणि सभा घेण्यासारखी परिस्थिती नसल्याचे मत त्यांनी नोंदविले. त्यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रभारी अध्यक्ष प्रकाश सातपुते यांच्याशी पोलिसांनी चर्चा केली. चर्चेनंतर गांधी मैदानाऐवजी मेरी वेदर मैदानावर सभा घेण्याबाबत चर्चा झाली. स्थानिक अधिकाऱ्यांच्या तसेच कोल्हापुरात आलेल्या एस.पी.जी.च्या / अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर दिल्ली येथील कार्यालयाकडून रात्री उशिरा सोनिया गांधी यांच्या सभेचे ठिकाण बदलण्यात आले.
सकाळी सात वाजल्यापासून मेरी वेदर मैदानावर तयारी सुरू झाली. व्यासपीठ व लक्कडकोट उभारण्यास सुरुवात झाली. सोनिया गांधी कोणत्या रस्त्यावर येणार व सभा संपल्यानंतर कशा परत जाणार, याचे नियोजन तातडीने सुरू झाले. सभेच्या तयारीसाठी फारच कमी वेळ मिळणार असल्याने गांधी मैदानावरचे काम ज्या ठेकेदाराला दिले होते, त्याच्याऐवजी दुसऱ्याच ठेकेदाराला काम देण्यात आले. आज दिवसभर मैदानावर सुरक्षारक्षकांचा पहारा होता. मैदानाची तसेच परिसराची पाहणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह अनेक अधिकारी सभेच्या ठिकाणची पाहणी करीत होते.
अनेक मान्यवर नेते येणार
सोनिया गांधी यांच्या सभेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, चिटणीस स्वराज वाल्मीकी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, आदी नेतेही कोल्हापुरात येत आहेत. सभा अकरा वाजता सुरू होणार असून सोनिया गांधी बारा वाजता सभेच्या ठिकाणी येतील.