सोनिया गांधी भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 18:14 IST2017-02-11T18:02:39+5:302017-02-11T18:14:51+5:30
सोनिया गांधी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत

सोनिया गांधी भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात
>ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 11 - सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत. विधानसभा नाही तर चक्क जिल्हापरिषदेच्या निवडणूक रिंगणातून सोनिया गांधी लढणार आहेत. इतकंच नाही तर त्यांना तिकीट देणारा पक्ष आहे भाजपा. लांजा तालुक्यातील भांबेड जिल्हापरिषद गटातून सोनिया गांधींना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
सोनिया गांधी निवडणूक लढवतायत आणि तीपण जिल्हा परिषदेची, तेदेखील भाजपाच्या तिकीटवर असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. हे कसं काय शक्य आहे असं म्हणत असाल तर तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. कारण या तुम्ही समजत आहात त्याप्रमाणे या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी नसून रत्नागिरीतल्या सोनिया गांधी आहेत. फक्त नाव सारखं असल्यामुळे सर्वांचाच गैरसमज होत आहे. या सोनिया गांधी भांबेड जिल्हापरिषद गटातून भाजपच्या उमेदवार आहेत.
गैरसमज होत असल्याने या सोनिया गांधी प्रचारासाठी किंवा मत मागण्यासाठी गेल्या की लोकांची पाहण्यासाठी गर्दी होत आहे. समोर पाहिल्यावर मग त्यांना आपला गैरसमज झाल्याचं कळत आहे. आता सोनिया गांधी नाव असूनदेखील कमळ फुलतं की हात रिकामे राहतात हे निकालानंतरच कळेल.