‘कृष्णा’त वडिलांनी दिला मुलाला ‘पुनर्जन्म’
By Admin | Updated: May 14, 2015 23:55 IST2015-05-14T22:49:57+5:302015-05-14T23:55:20+5:30
कऱ्हाड : जिल्ह्यातील पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

‘कृष्णा’त वडिलांनी दिला मुलाला ‘पुनर्जन्म’
कऱ्हाड : ‘जन्म देणाऱ्या आईच्या मायेची महती सर्वांनाच माहिती असते; पण कधी-कधी बापही आपल्या मुलासाठी मायेचा ओलावा निर्माण करतो आणि मुलाला ‘जन्म’ देऊन जातो. अशीच घटना कृष्णा रुग्णालयात घडली आहे.
शरीरातील दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे गेले तीन वर्षे डायलेसिस उपचार घेत जीवनाशी झुंज देणाऱ्या इचलकरंजीच्या दत्ता बोडके या २४ वर्षी तरुणाला दुसरी मूत्रपिंड बसविण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अखेर त्याच्या वडिलांनीच आपल्या मुलासाठी स्वत:ची एक मूत्रपिंड देऊन आपल्या मुलाला ‘पुनर्जन्म’ मिळवून दिला आहे. दत्ता बोडकेवर नुकतीच कृष्णा रुग्णालात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची (मूत्रपिंड ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. सातारा जिल्ह्यात
अशाप्रकारे पहिल्यांदाच हे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
इचलकरंजीत एका सूतगिरणीत काम करत असणाऱ्या ४८ वर्षीय रावसाहेब बोडके यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे. त्यांचा मुलगा दत्ता याला वयाच्या १९ व्या वर्षापासून मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाला. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही रावसाहेब बोडके यांनी आपल्या मुलावरील उपचारात कोणतीही कमतरता केली नाही; पण हळूहळू आजार बळावल्याने दोन वर्षांनंतर दत्ताच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आणि त्याच्यापुढे डायलेसिस उपचार घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला
नाही.
डायलेसिससाठी त्याला आठवड्यातून तीनवेळा इचलकरंजीतून कोल्हापूरला जावे लागत असत. एक दिवसा आड सुरू असलेल्या या उपचारामुळे त्याला बारावीनंतरचे शिक्षणही घेता येणे अवघड झाले. त्याने पुढील शिक्षणाला रामराम ठोकून घराला आणि स्वत:वरील उपचारांसाठी आर्थिक हातभार मिळावा म्हणून सूतगिरणीतच अकाऊंटंची नोकरी पत्करली. नोकरी करताना वारंवार जेव्हा उपचारासाठी जायला लागायचे तेव्हा कंपनीतील सगळेच लोक सहकार्य करायचे, असे दत्ता आवर्जून सांगतो. सुमारे तीन वर्षे डायलेसिस उपचार घेणाऱ्या दत्ताला दुसरी मूत्रपिंड बसविण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी रावसाहेब बोडके यांना याबाबत कल्पना दिली. शेवटी रावसाहेब बोडके यांनी उदार अंत:करणाने आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करून स्वत:च आपल्या मुलाला मूत्रपिंड देण्याची तयारी दर्शविली.
यानुसार रावसाहेब आणि त्यांचा मुलगा दत्ता हे दोघे १६ एप्रिल रोजी कृष्णा रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या सर्वप्रकारच्या तपासण्या केल्यानंतर रावसाहेब यांची मूत्रपिंड दत्ताशी जुळत असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानुसार न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अनिल हुद्देदार व डॉ. नरेंद्र बसर्गे यांनी ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. (प्रतिनिधी)
अनेकांनी मोलाची साथकृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय प्रशासक डॉ. आर. जी. नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मूत्रपिंंड तज्ज्ञ डॉ. विलास नाईक, भूलतज्ज्ञ डॉ. विठ्ठल धुळखेड, डॉ. नसिमा कणसे, डॉ. कौस्तुभ चव्हाण, डॉ. अपर्णा पतंगे, नर्सिंग विभागाच्या संचालिका टाटा, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली यादव यांनी महत्त्वाची कामगिरी
बजावली.
शस्त्रक्रियेनंतर पिता-पुत्र दोघांचीही प्रकृती चांगली असून, दोघांनाही नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, दत्ता बोडके या युवकाची कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा आरोग्य विज्ञान अभिमत विद्यापीठाचे आरोग्य विज्ञान संचालक डॉ. आर. के. अयाचित यांनी भेट घेऊन विचारपूस केली आणि दोघाही पिता-पुत्रांच्या धैर्याचे कौतुक केले.