Maharashtra News: महायुती सरकार स्थिर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीत युद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा घेतलेला निर्णय आणि एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला उपमुख्यमंत्री आरोग्य कक्ष याने या चर्चेला हवा दिला. पण, शिंदेंनी असेही काही नसल्याचे सांगत सर्व चर्चा फेटाळून लावल्या. आता यावर उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेत उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कोकणातील आणखी काही नेते शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याची चर्चा सुरू झाली. यात वैभव नाईक याचेही नाव चर्चेत आहे. चर्चेबद्दल भाष्य करताना उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही लोकांना वाद लावायचा आहे, असे म्हटले आहे.
उदय सामंत काय बोलले?
"काही लोकांना देवेंद्रजींमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद लावायचा आहे. तसा प्रयत्न ते करताहेत. पण ते परिपक्व राजकारणी आहेत. अशा भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. असा कोणी जर वाद लावत असेल आणि त्यांना वाटत असेल की, वाद लागेल, तर त्यांचे मनसुबे उधळून टाकणार ते दोन नेते आहेत", असे उदय सामंत म्हणाले.
ना कोल्ड वॉर, ना हॉट वॉर
उदय सामंत म्हणाले, "कोल्ड वॉर नाहीये. हॉट वॉर नाहीये. कसलेही वॉर नाहीये. अतिशय समन्वयाने महायुतीचे सरकार वेगाने काम करत आहेत."
वैभव नाईकांबद्दल उदय सामंतांचं भाष्य
"वैभव नाईक हे थेट शिंदे साहेबांच्या संपर्कात असतील, तर मला हे माहिती नाही. पण, माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. ते माझे महाविद्यालयापासूनचे मित्र आहेत. त्यांनी तसा निर्णय घेतला, तर निलेश राणेंना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. पण, तिथे आता आमदार निलेश राणे आहेत. यासंदर्भात निलेश राणे यांच्याशी देखील चर्चा करावी लागणार आहे", असे उदय सामंत यांनी सांगितले.