प्रश्नपत्रिका येईल तशी उत्तरपत्रिका सोडवू; सुधीर मुनगंटीवारांचा सेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 09:02 AM2022-06-30T09:02:28+5:302022-06-30T09:03:10+5:30

सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानभवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधानसभा सचिवांची भेट घेतली. 

Solve the answer sheet as soon as the question paper arrives; Sudhir Mungantiwar's attack on the shiv sena | प्रश्नपत्रिका येईल तशी उत्तरपत्रिका सोडवू; सुधीर मुनगंटीवारांचा सेनेवर हल्लाबोल

प्रश्नपत्रिका येईल तशी उत्तरपत्रिका सोडवू; सुधीर मुनगंटीवारांचा सेनेवर हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई : भाजपची भूमिका ही ‘वेट अँड वॉच’ची आहे. जशी प्रश्नपत्रिका येईल, तशी उत्तरपत्रिका सोडवू. सध्याची चाचणी ही सत्ताधाऱ्यांची आहे. यात भाजपाचा विषय नाही. विधानसभा निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही आमच्या मित्र पक्षाने खुर्चीसाठी गद्दारी केली. जनादेशाचा अवमान केला, आता फेडत आहेत, अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. 

सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानभवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधानसभा सचिवांची भेट घेतली. 

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांची सुरक्षा आणि विधानसभेतील आसन व्यवस्थेसंदर्भात चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, काही लोक धमक्या देत आहेत, गुंडगिरीची भाषा करत आहेत. अशांतता निर्माण करणारे भाष्य करत आहेत.  याकडे लक्ष द्यावे आणि विधिमंडळात प्रत्येकाला मुक्त वातावरणात लोकशाहीचा अधिकार बजावता यावा, हे आम्ही विधिमंडळ सचिव आणि उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. हा महाराष्ट्र आहे. इथे गुंडगिरी करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी महाराष्ट्राची जनता आणि पोलीस विभागाचे अधिकारी सदसदविवेकबुद्धीने कृती करतील, असेही ते म्हणाले. राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर राज्य सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 

यावर, तुमच्याकडे बहुमत असेल तर एका तासात ते दाखवू शकता. बहुमताचे दोन हात दाखवायला ३० दिवसांची मुदत कशाला हवी? हे ५ मिनिटांचे काम आहे. यात काय नवीन नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. यामुळे राजकारण तापले आहे.

Web Title: Solve the answer sheet as soon as the question paper arrives; Sudhir Mungantiwar's attack on the shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.