मुंबई : राज्यातील साखर उद्योग अडचणीत असला, तरी ऊसतोडणी मजुरांना त्याची झळ बसता कामा नये. साखर उद्योगातील या सर्वात लहान घटकाला वाऱ्यावर न सोडता त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले. ऊसतोडणी कामगारांच्या प्रचलित दरात वीस टक्के वाढ, मुकादमांचे कमिशन, वाहतूक दर, ऊस तोडणी कामगारांचे फरक बिल इत्यादी प्रलंबित मागण्यांबाबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मजूर संघटनांच्या प्रतिनिधींनी पवार यांची भेट घेतली. पवार म्हणाले की, ‘दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व केले. मुंडे आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोडणी कामगार, मजूर आणि साखर व्यवसायातील अडचणी एकत्र बसून सोडवल्या, पण आता सत्तेबाहेर असल्याने ऊसतोडणी मजुरीतील वीस टक्के वाढीसंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रथमत: साखर संघाच्या लोकांची बैठक घ्यावी लागेल. त्यानंतर कामगार खात्याने त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे, तसेच मुख्यमंत्र्यांनीही याबाबत पुढाकार घेऊन मजुरांचे प्रश्न सोडवावेत, चर्चेसाठी त्यांच्यासोबत बसण्याची माझी तयारी आहे,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>सर्व कामगार मराठवाडा, नगरसारख्या मागास भागातील आहेत. त्यांच्या मागण्या तत्काळ सोडविण्यासाठी राज्य सहकारी साखर संघासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.>विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता म्हणून ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूक ठेकेदार यांच्या वतीने मी स्वत: मुख्यमंत्र्यांना कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
ऊसतोडणी मजुरांचे प्रश्न सोडवावेत
By admin | Updated: October 19, 2015 03:05 IST