वीजदरवाढीवर तोडगा निघणार !
By Admin | Updated: March 14, 2015 05:38 IST2015-03-14T05:38:14+5:302015-03-14T05:38:14+5:30
राज्यातील वीजग्राहक, उद्योजक आणि यंत्रमागधारकांचे वीजदर नियंत्रित ठेवणे हे केवळ ग्राहकांच्या हिताचे नाही, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही

वीजदरवाढीवर तोडगा निघणार !
मुंबई : राज्यातील वीजग्राहक, उद्योजक आणि यंत्रमागधारकांचे वीजदर नियंत्रित ठेवणे हे केवळ ग्राहकांच्या हिताचे नाही, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नी येत्या मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, प्रसंगी बैठक बोलावू आणि मार्ग काढून अंतिम निर्णय घडवून आणू, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीसह महाराष्ट्र राज्य बुनकर फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले.
राज्यातील वीजदरवाढ प्रश्नावर वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य बुनकर फेडरेशनच्या शिष्टमंडळाची शिवसेना भवनात शुक्रवारी बैठक झाली. समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, बुनकर फेडरेशनचे अध्यक्ष फैजान आझमी, महाराष्ट्र चेंबरचे अनिल गचके आणि अन्य विविध उद्योजक व यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी शिष्टमंडळाचे विजेबाबतचे प्रश्न समजावून घेत त्यांच्याशी चर्चा केली.
राज्यातील वीज घोटाळा हा सिंचन घोटाळ्यापेक्षा अधिक मोठा आणि गंभीर आहे. अकार्यक्षमता, अवाढव्य भांडवली खर्च, प्रचंड वितरण गळती आणि भ्रष्टाचारामुळे स्थिती गंभीर बनली आहे. वीजदरवाढीमुळे कोल्हापूर, सांगली, ठाणे, नागपूर, चंद्रपूर येथील उद्योजक कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत स्थलांतरित होत आहेत. यावर मार्ग काढण्यात आला नाही तर राज्याचे नुकसान होईल, आदी बाबी शिष्टमंडळाने बैठकीदरम्यान निदर्शनास आणून दिल्या. यावर शिवसेनेकडून वीजप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. तथापि अंतिम व स्पष्ट निर्णय होत नसल्याने उद्योजक व यंत्रमागधारकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंदोलनाची माहिती या वेळी प्रताप होगाडे यांनी दिली. शिवाय तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)