सौरपथदिव्यांच्या योजनेची चौकशी
By Admin | Updated: April 24, 2015 01:21 IST2015-04-24T01:21:47+5:302015-04-24T01:21:47+5:30
सौरपथदिव्यांची योजना राबविताना काही चुका झाल्या आहेत, असे मलाही प्रथमदर्शनी वाटत आहे. त्यामुळे योजनेची चौकशी केली जाईल,

सौरपथदिव्यांच्या योजनेची चौकशी
सुधीर लंके, पुणे
सौरपथदिव्यांची योजना राबविताना काही चुका झाल्या आहेत, असे मलाही प्रथमदर्शनी वाटत आहे. त्यामुळे योजनेची चौकशी केली जाईल, असे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘दिव्याखाली अंधार’ ही वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केली. समाजकल्याण विभागाकडून दलित वस्त्यांमध्ये राबविल्या जात असलेल्या ३४० कोटी रुपयांच्या सौरपथदिव्यांच्या योजनेबाबत त्यात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. माजी समाजकल्याण मंत्र्यांच्या शिफारशीवरून योजनेचे ठेकेदार निवडण्यात आले होते याकडेही या वृत्तमालिकेतून लक्ष वेधण्यात आले होते.
यासंदर्भात बोलताना बडोले म्हणाले, संबंधित योजना पूर्वीच्या सरकारच्या कालखंडात सुरू झालेली आहे. खरेतर, एवढी मोठी योजना राबविताना सर्व बाबी तपासूनच अंमलबजावणी व्हायला हवी. योजनेबाबत संशय निर्माण झाला असेल व तक्रारी असतील तर जरूर चौकशी करू.
योजनेबाबत जिल्ह्यांच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे नागरिकांच्या काही तक्रारीही आल्याचे समजते. त्याची दखल घेऊन समाजकल्याण आयुक्तांनीही चौकशी सुरू केली आहे.