सौर पंप किफायत असावेत
By Admin | Updated: December 17, 2014 00:32 IST2014-12-17T00:32:24+5:302014-12-17T00:32:24+5:30
शेतकऱ्यांना ५ लक्ष सौर कृषिपंप देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी योजनेला सौर ऊर्जा क्षेत्रातील सर्वच प्रमुख उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सौर पंप किफायत असावेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ५ लक्ष सौर कृषिपंपांची संकल्पना
नागपूर : शेतकऱ्यांना ५ लक्ष सौर कृषिपंप देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी योजनेला सौर ऊर्जा क्षेत्रातील सर्वच प्रमुख उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सौरऊर्जेवरील कृषिपंपांच्या निर्मितीसाठी तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर बसविण्यासाठीचे सादरीकरण उद्योगसमूहाने मुख्यमंत्र्यांसमोर केले.
रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंगळवारी देशातील प्रमुख सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या उद्योग समूहाच्या सादरीकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील कृषिपंप उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन कार्यक्रम राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी जास्तीत जास्त उपयोग होईल, तसेच ५ हॉर्स पॉवरपर्यंतचा कृषिपंप अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध व्हावेत, यादृष्टीने संशोधन करण्याची सूचना केली. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अजय मेहता, मेडाचे प्रधान सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्सचे राम भोगले तसेच अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
राज्यातील ५ लक्ष शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याच्या संकल्पनेची केंद्र सरकारनेही दखल घेतली असून, जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय सौर कृषिपंपाचे समूह विकसित करण्यात येईल. सध्या ५ हॉर्सपॉवर पंपासाठी ६ लक्ष ५० हजार खर्च येत असून, हा खर्च ३ लक्ष ५० हजार रुपयांपर्यंत आणण्यासाठी उद्योग समूहाने संशोधन करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. महसूल विभागातर्फे सर्वेक्षण करून ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा.
अजय मेहता म्हणाले की, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी तसेच त्यांना सौरपंप देताना अनुदान, शेतकरी आणि बँकेचा सहभाग निश्चित करण्यासाठी सौरऊर्जा पंपाची किंमत आणि दुरुस्ती तसेच देखभालीचे धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने उद्योजकांनी प्रस्ताव सादर करावेत.
यावेळी सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सनएडिसन या उद्योग समूहाचे अध्यक्ष पशुपती गोपालन, किर्लोस्कर उद्योग समूहातर्फे शिप्रा त्रिपाठी व अजय शिरोळकर, जैन सोलरतर्फे अनिल जैन, शक्ती सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रातील उद्योग समूहाचे पाटीदार, आयडीबीआय बँकेतर्फे बोंगीरवार यांनीही सादरीकरण केले.यावेळी मेडाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक व्ही.एम. पांडे, हेमंत कुळकर्णी, विकास दाभाडे, अतुल फडके, विवेक देशपांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)