प्रवासी गाड्यांवर लावणार सौर पॅनल
By Admin | Updated: July 1, 2015 01:42 IST2015-07-01T01:42:59+5:302015-07-01T01:42:59+5:30
इंधनबचतीच्या दिशेने रेल्वेची वाटचाल.

प्रवासी गाड्यांवर लावणार सौर पॅनल
राम देशपांडे /अकोला : प्रवासी गाड्यांमधील वातानुकूलित प्रणाली, पंखे, प्रकाश व्यवस्था व चार्जिंग पॉइंटकरिता लागणारी वीज, प्रवासी डब्यांच्या छतावर सोलर पॅनल लावून निर्माण करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यातून वीज आणि इंधनाची मोठी बचत करता येईल. बेंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतील वैज्ञानिकांनी यशवंतपूर-भोपाल एक्स्प्रेस आणि चेन्नई-कोयंबतूर शताब्दी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना जोडलेल्या विशेष डब्यांवर प्रत्येकी १८0 वॉट क्षमतेचे सोलर पॅनल लावून याची यशस्वी चाचणी घेतली. रेल्वेच्या चेन्नई येथील कोच निर्माण फॅक्टरीमध्ये निर्माण करण्यात आलेले सोलर पॅनल ज्या दोन्ही गाड्यांवर प्रयोगाखातर लावण्यात आले होते, त्यापासून निर्माण झालेले विजेचे प्रमाण वैज्ञानिकांना थक्क करणारे ठरले. प्राथमिक स्वरूपात घेण्यात आलेल्या या चाचणीतील आकडेवारीवर वातावरणाचा तसेच गाडीच्या वेगावर काय प्रभाव पडतो, याचीदेखील तपासणी वैज्ञानिकांमार्फत घेतली जात आहे. प्रवासी डब्यांच्या छतांवर लावलेले सोलर पॅनल ज्याप्रमाणे उन्हाळय़ात काम करते, त्याच क्षमतेने पावसाळय़ात आणि हिवाळय़ात काम करतील की नाही, याचीदेखील विशेष तपासणी वैज्ञानिकांमार्फत घेतली जात असून, अंतिम निष्कर्ष हाती लागताच हा प्रयोग अंतिम केला जाणार असल्याचे रेल्वे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेद्वारा चालविल्या जाणार्या राजधानी, शताब्दी, दुरंतो तसेच गरीबरथसारख्या गाड्यांना दोन पॉवर कार लावल्या जातात. प्रवासी डब्यांच्या छतांवर सोलर पॅनल लावून ही गरज संपुष्टात आणल्यास वर्षाकाठी सव्वा कोटी लीटर डिझेलची बचत रेल्वे करू शकेल, असा अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. पॉवर कारची गरज संपल्यास त्या जागी प्रवासी डबे जोडून रेल्वेच्या उत्पन्नातदेखील भर पडू शकते, असा अंदाजही अधिकार्यांनी व्यक्त केला.