सोलापूर जि.प. पदाधिकाऱ्यासह पत्रकाराचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: July 11, 2016 05:46 IST2016-07-11T05:46:08+5:302016-07-11T05:46:08+5:30
आडव्या आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटून झालेल्या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार, तर तिघे जखमी झाले.

सोलापूर जि.प. पदाधिकाऱ्यासह पत्रकाराचा अपघाती मृत्यू
इंदापूर (जि. पुणे) : आडव्या आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटून झालेल्या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार, तर तिघे जखमी झाले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोलनाक्याजवळ रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती पंडित साहेबराव वाघ (४२) व स्थानिक पत्रकार सुरेश बारवे (४५, टेंभुर्णी) यांचा समावेश आहे.
टेंभुर्णी येथील शिवाजी गोंदिल यांच्या मुलीच्या विवाह समारंभास उपस्थित राहिल्यानंतर हे सर्व जण इंडिगो कारमधून इंदापूरहून पिंपळनेर (ता. माढा, जि. सोलापूर) येथील विवाहसमारंभासाठी निघाले होते. इंदापूरपासून चार किलोमीटरवर आल्यानंतर त्यांच्या कार पुढे अचानक आडव्या आलेल्या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची कार उलटली. सुरेश दत्तू दुरंगे (४८), दिलीप भोसले , अशोक खटके (४२ रा. तांबवे, ता. माढा) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. (प्रतिनिधी)