सोहराबुद्दीन चकमक; शहा दोषमुक्त
By Admin | Updated: December 31, 2014 09:59 IST2014-12-31T02:31:05+5:302014-12-31T09:59:51+5:30
गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कौसरबी यांच्या बनावट एन्काउंटर प्रकरणातून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले़

सोहराबुद्दीन चकमक; शहा दोषमुक्त
मुंबई : गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कौसरबी यांच्या बनावट एन्काउंटर प्रकरणातून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले़
गुजरात पोलिसांनी ही बनावट चकमक घडवून आणली तेव्हा शहा गुजरातचे गृहमंत्री होते़ या घटनेच्या वेळी ते एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा सीबीआयचा दावा होता़ तसेच शहांविरोधात कट, हत्येसाठी अपहरण करणे, बेकायदापणे ताब्यात ठेवण्यासाठी अपहरण करणे यासह विविध आरोप ठेवण्यात आले होते़ सीबीआय शहा यांच्याविरोधात सबळ पुरावे सादर करू शकली नाही, असा निष्कर्ष नोंदवत विशेष सीबीआय न्या़ ए़ बी़ गोसावी यांनी शहा यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले़ आदेशाच्या तपशीलवार प्रतीवर न्यायाधीशांची स्वाक्षरी न झाल्याने यात न्यायालयाने नोंदविलेली इतर निरीक्षणे उपलब्ध झालेली नाहीत़ गुजरात येथे २००५ मध्ये झालेल्या बनावट चकमकीचा प्रमुख साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचेही नंतर पोलिसांनी एन्काउंटर केले़ यात अमित शहा व गुजरात पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर समावेशाचा ठपका ठेवत सीबीआयने याचे आरोपपत्रही दाखल केले़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला सुनावणीसाठी मुंबईत वर्ग करण्यात आला़
विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरू असताना या प्रकरणातून दोषमुक्त करण्याचा अर्ज शहा यांनी केला होता़ गुजरातचा गृहमंत्री असताना नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी माझी होती़ त्या हेतूने मी सतत पोलिसांच्या संपर्कात असायचो, मात्र या एन्काउंटरशी माझा काहीही संबंध नाही़ या प्रकरणातून दोषमुक्त करा, अशी विनंती शहा यांनी अर्जात केली होती़ याला सोहराबुद्दीन याचा भाऊ रुबाबुद्दीन तसेच सीबीआयचा देखील शहा यांच्या अर्जाला विरोध होता़
बनावट चकमकीप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका ‘आश्चर्यकारक आणि चिंताजनक’ असल्याचे काँग्रेसने म्हटले असून, याप्रकरणी सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ सीबीआय सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे़ - वृत्त /१0