डेंग्यूपासून वाचवणार सोशल नेटवर्किंग साईट्स
By Admin | Updated: November 3, 2014 04:40 IST2014-11-03T04:40:18+5:302014-11-03T04:40:18+5:30
नोव्हेंबर महिना उजाडला तरीही डेंग्यूमुळे मृत्यू होत आहेत आणि डेंग्यूचे रुग्णदेखील आढळून येत असल्याने महापालिका चिंतित आहे.

डेंग्यूपासून वाचवणार सोशल नेटवर्किंग साईट्स
मुंबई : नोव्हेंबर महिना उजाडला तरीही डेंग्यूमुळे मृत्यू होत आहेत आणि डेंग्यूचे रुग्णदेखील आढळून येत असल्याने महापालिका चिंतित आहे. ‘कुठेही पाणी साठू देऊ नका!’ अशी भित्तीपत्रके लावून, जाहिराती करूनही फायदा झालेला नाही हे महापालिकेच्या लक्षात आल्यावर व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवरून जनजागृतीला सुरुवात केली आहे.
ज्येष्ठ नागरिकही आता व्हॉट्स अॅप आणि फेसबुक वापरतात. सोशल साईट्सवर मेसेज पडल्यास तत्काळ अनेकांना फॉरवर्ड केला जातो. यामुळे फक्त जाहिराती, भित्तीपत्रकांमध्ये न अडकता आता पालिका ही हायटेक जनजागृती करते आहे. म्हणूनच डेंग्यूविषयी जनजागृती करण्यासाठी व्हॉट्स अॅपवर जाहिरातीचा आॅडिओ तर फेसबुकवर भित्तीपत्रकाचे फोटो शेअर केले आहेत.
आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी केईएम रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. केईएम रुग्णालयातही डांसाची पैदास झाल्याची ठिकाणे आढळून आली. यानंतरच आठवड्याभरातच नायर रुग्णालयात एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे १७४ रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी)