सोशल मीडियावर विमानांची ‘धडक’!
By Admin | Updated: December 23, 2014 03:22 IST2014-12-23T03:22:29+5:302014-12-23T03:22:29+5:30
सोशल मीडियाचा जपून वापर केला नाही तर किंवा त्यावर नव्हत्याचे होते केले किंवा परिस्थिती समजून न घेता पोस्ट केली तर काय होऊ शकते

सोशल मीडियावर विमानांची ‘धडक’!
छिंदवाडा : सोशल मीडियाचा जपून वापर केला नाही तर किंवा त्यावर नव्हत्याचे होते केले किंवा परिस्थिती समजून न घेता पोस्ट केली तर काय होऊ शकते याचा अनुभव सोमवारी राजधानी दिल्ली आणि भोपाळमध्ये आला.
विमानतळावर नाही; परंतु सोशल मीडियावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि छिंदवाडाचे खा. कमलनाथ यांचे विमान धावपट्टीवर समोरासमोर न येऊनही बातमीचा विषय बनले. छिंदवाडाची धावपट्टी छोटी. या धावपट्टीवर क्वचित एकापेक्षा जास्त विमाने एकामागोमाग उतरतात. मुख्यमंत्री चौहान आणि कमलनाथ यांची विमाने साधारणत: पाऊण तासाच्या अंतराने इमलीखेडा येथील धावपट्टीवर उतरली. मुख्यमंत्र्यांचे विमान आधी उतरले. त्यातून चौहान कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत स्वीकारून निघून गेले. धावपट्टीच्या एका बाजूला त्यांचे विमान उभे केले गेले होते. नंतर खा. कमलनाथ यांचे विशेष विमान जेव्हा विमानतळावर उतरत होते तेव्हा काही कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी चौहान यांच्या विमानाला धक्का देऊन सुरक्षित अंतरावर पार्किंगच्या दिशेने केले.
तशी ही नेहमीची पद्धत होती; परंतु सोशल मीडियावर (व्हॉटस् अॅप) कोणी तरी कॉमेंटसह ही घटना पोस्ट केली. कॉमेंट अशी होती की, ‘छिंदवाडा विमानतळावर कमलनाथ आणि शिवराजसिंह चौहान यांचे विमान समोरासमोर आले. या गडबडीत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विमानाला धावपट्टीवरून धक्का देऊन वेगळे केले आणि एक मोठा अपघात टळला.’
‘दोन व्हीआयपी विमानांबाबत सुरक्षेसंबंधी या गंभीर बेपर्वार्ई’ची ही कथित बातमी अतिवेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि दिल्ली ते भोपाळपर्यंत त्याबद्दल विचारणा सुरू झाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे वस्तुस्थिती स्पष्ट केली.
धावपट्टी छोटी असल्यामुळे विमानाला धक्का देऊन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलविणे ही सामान्य बाब आहे, कारण येथे छोटी विमानेच उतरत असतात. या विमानांना ‘टो’ करण्यासाठी
कोणतेही वाहन किंवा साधन उपलब्ध नसते. कोणा अतिउत्साही सोशल मीडिया युजरने दिलेल्या बातमीमुळे छिंदवाडा पुन्हा एकदा वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)