ढोलाच्या नादातून सामाजिक बांधिलकी

By Admin | Updated: September 6, 2016 01:18 IST2016-09-06T01:18:17+5:302016-09-06T01:18:17+5:30

तरुणाईला विधायक दिशा देणाऱ्या ढोल खेळाचा खेड तालुक्यातील युवकांना चांगलाच ‘नाद’ लागला आहे

Social commitment from Dhola Nada | ढोलाच्या नादातून सामाजिक बांधिलकी

ढोलाच्या नादातून सामाजिक बांधिलकी

काळूस : तरुणाईला विधायक दिशा देणाऱ्या ढोल खेळाचा खेड तालुक्यातील युवकांना चांगलाच ‘नाद’ लागला आहे. खेळाच्या सुपाऱ्यांच्या पैशातून स्वत: बरोबरच गावाच्या विकासाचे अर्थकारण बदलू शकत असल्याचे विधायक चित्र तालुक्यातील सुमारे १५० ढोल पथकांनी दाखवून दिले आहे. याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत निराधारांच्या मदतीला पथकांनी पुढाकार घेतला आहे.
तालुक्याच्या पश्चिमपट्ट्यासह वाकी, रोहोकल, चांदूस भागातील ढोल पथकांच्या सरावाचा नाद सध्या चांगलाच घुमतोय. तालुकाभरात वांद्रा, अंबोली, विराम, गडद, आडे, सुपे, सातकरवाडी, हेंद्रुज, वाकी, रोहोकल शिवाय राजगुरुनगर शहरी भागातील ढोल पथकांची संख्या सुमारे १५० च्या घरात आहे. ढोलच्या एका पथकात सरासरी ४० ते ७० युवक असतात. खेळाला भेटणाऱ्या सुपारीची रक्कमही २५ ते ३० हजारांपासून २ ते ३ लाखांच्या घरात असते.
पथकांचे सामाजिक भान
कुणाचे लग्न, तर कुणाचे आजारपण, तर कधी एखाद्या गरजूच्या अंत्यविधीपासून दशक्रियेपर्यंतच्या खर्चासाठी मदत ढोल मंडळाच्या माध्यमातून होत असल्याचे पथकातील युवक अभिमानाने सांगतात. डीजेच्या कर्णकटू आवाजावर मद्यधुंद होऊन अश्लील चाळे करत नाचणाऱ्या तरुणांकडे पाहिल्यावर सामाजिक भान आणि जाण ठेवून सांस्कृतिक वारसा जपत एकमेकांसाठी मदतीचा हात पुढे करत स्वत: बरोबरच समाजहित जपणाऱ्या या ढोलपथकातील युवकांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
निराधारांना पथकांचा आधार
वाकी येथील भैरवनाथ ढोल पथकास २४ वर्षे पूर्ण झाली. पुढील वर्षी या मंडळाचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. मंडळाचे सदस्य प्रशांत गवळी यांच्या लग्नात आर्थिक मदत, तसेच भाऊ यशवंत माकर् यांच्या मुलाच्या अपघातावेळी मंडळाने मदत केली. परिस्थिती नसलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा या खेळामुळे जपली जात असल्याचे अध्यक्ष नामदेव पारधी, धोंडिबा टिपरे, प्रशांत गवळी, भानुदास टोपे, संयोजक लक्ष्मण टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Social commitment from Dhola Nada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.