म्हणून ‘भारत माता की जय’ म्हणतात - सरसंघचालक
By Admin | Updated: June 9, 2016 22:00 IST2016-06-09T21:43:36+5:302016-06-09T22:00:37+5:30
जगातील अनेक देशांना पितृत्वाच्या नजरेने तेथील लोक पाहतात. परंतु आपल्या देशात लोक देशाच्या भूमीला सर्वस्व मानतात. देश आणि जनता यांच्यात सूत्ररुप भावना असते. नियम कुठेही नाही.

म्हणून ‘भारत माता की जय’ म्हणतात - सरसंघचालक
ऑनलाइन लोकमत
नागपूर दि. ९ : जगातील अनेक देशांना पितृत्वाच्या नजरेने तेथील लोक पाहतात. परंतु आपल्या देशात लोक देशाच्या भूमीला सर्वस्व मानतात. देश आणि जनता यांच्यात सूत्ररुप भावना असते. नियम कुठेही नाही. पण लोक देशाला मातृस्थानी मानतात. मातृत्वाची ही भावना देशासोबत लोकांना एकत्र जोडते व यातूनच ‘भारत माता की जय’ असे म्हटल्या जाते, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले. संघ कुणाचा विरोध करत नाही. तसेच कुणाला प्रतिक्रिया म्हणूनदेखील संघ काम करत नाही. हिंदुत्व धर्म नव्हे तर संस्कृतीशी निगडीत आहे. म्हणूनच सर्व धर्माचे लोक येथे राहत असले तरी हा हिंदूंचा देश म्हटल्या जातो. समाजात एकात्मता वाढवून शोषणुक्त समाजाची निर्मिती करणे आवश्यक आहे, असेदेखील ते म्हणाले.
देशाचा विकास हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे. परंतु अनेकदा पात्रता नसलेल्या लहान लोकांचा अनावश्यक विरोध करण्यात येतो. या विरोधातूनच ते मोठे होतात. त्यामुळे टीका करणाºयांकडे दुर्लक्ष करायला हवे. गरजणारे कधीच बरसत नाही, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी संघ परिवारातील संस्थांना अशा वादांच्या वेळी शांत राहण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला. दादरी वाद, ‘जेएनयू’प्रकरण, कन्हैय्या वाद इत्यादींमध्ये संघ परिवारातील संस्थांकडून विरोध व प्रतिक्रिया देण्यात आली होती व प्रत्येक प्रकरणाची देशस्तरावर पेटले. यासंबंधात सरसंघचालकांनी परिवारातीलच संस्थांचे आपल्या भाषणातून कान टोचले.
संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा गुरुवारी सायंकाळी रेशीमबाग मैदान येथे समारोप झाला. याप्रसंगी कोलकाता येथील सुप्रसिद्ध स्तंभलेखक रंतिदेव सेनगुप्ता हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. देशासमोर आजच्या घडीला अनेक समस्या आहेत. या समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा त्यांचे उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. काही जणांकडून विरोध होतो व ते कार्य करण्यापेक्षा जोरजोराने बोलण्यातच धन्यता मानतात. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हिताचे असते. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात देशाबाबत प्रेम निर्माण करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ही भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. शासनाच्या भरवशावर राहण्यापेक्षा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सामान्य मनुष्याला प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. लोकशक्तीच्या जागरणासाठी देशाच्या मूल्यांचे पुनर्जागरण करावे लागेल, असे डॉ.भागवत म्हणाले.
चीन व पाकिस्तानपासून देशाला धोका आहे.या राष्ट्रविरोधी शक्तींना आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे. राष्ट्रभक्तींचा हुंकार देशभरात गुंजलाच पाहिजे, असे मत रंतिदेव सेनगुप्ता यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी एन.वन्नीराजन, महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यंदाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग १६ मे पासून सुरू झाला. या वर्गात देशभरातून १८ ते ४० वर्षे वयोगटातील ९७८ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी सुरुवातीला दंड, नियुद्ध, योगासन इत्यादींची विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर घोष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. वर्गकार्यवाह हरीष कुळकर्णी यांनी प्रास्ताविकात वर्गाबाबत माहिती दिली.
जगात भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये पंतप्रधानांनी सुंदर भाषण केले. लोक स्विकार करतील अशा शैलीत ते मुद्देसूद भाषण करतात. विशेष म्हणजे परखड मतदेखील व्यक्त करतात. अमेरिकेत असल्यामुळे तेथील लोक व विचारांचे महिमामंडन त्यांनी केले. परंतु अनावश्यक स्तुती मात्र टाळली, या शब्दांत सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.