स्नेहल गवारेचा मारेकरी अद्याप मोकाट
By Admin | Updated: July 20, 2016 04:27 IST2016-07-20T04:27:19+5:302016-07-20T04:27:19+5:30
डोंबिवलीतील बहुचर्चित स्नेहल गवारे (२१) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या हत्येला बुधवारी नऊ वर्षे होत आहे.

स्नेहल गवारेचा मारेकरी अद्याप मोकाट
आकाश गायकवाड,
डोंबिवली- डोंबिवलीतील बहुचर्चित स्नेहल गवारे (२१) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या हत्येला बुधवारी नऊ वर्षे होत आहे. मात्र, पोलिसांना तिच्या हत्येचे गूढ उलगडण्यास अजूनही यश आलेले नाही. तिचा मारेकरी अजूनही मोकाट आहे. त्यामुळे पोलिसांच्या तापासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पांडुरंगवाडी येथील निनाद को-आॅप. सोसायटीत राहणारी स्नेहल अंधेरी येथील सरदार पटेल कॉलेज आॅफ इंजिनीरिंगमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत होती. तिची २० जुलै २००७ ला घरातच हत्या करण्यात आली होती. तिचे दोन्ही हात पाठीमागे बांधून तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. तिचा मृतदेह तिच्याच घरातील बेडरूममधील बेड बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता. आरोपीने एकही पुरावा मागे न ठेवलेला नाही. त्यामुळे खोलवर तपास केल्यानंतरही पोलिसांना आरोपीपर्यंत पोचणे पोलिसांना शक्य झालेले नाही.
दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांनी तिच्या आई-वडिलांपासून, ठराविक मित्रांचीही तपासणी केली होती. मात्र, तिचा मित्र हिरेन राठोडवर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याची जनरल सायकॉलॉजिकल टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट व बीईओएस टेस्ट करण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासात त्याच्यावर आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याची जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर तो शिक्षणासाठी परदेशात गेला होता.
तो परत आल्यानंतर त्यानेच हत्या केली, असा संशय आल्याने त्याला १७ एप्रिल २०१० ला अटक करण्यात आली. तो काम करत असलेल्या कंपनीतील सहकाऱ्यांची व त्याच्या मित्रांची कसून चौकशी करण्यात आली. परंतु, त्यातही एकही पुरावा त्याच्याविरोधात न मिळाल्यामुळे तो मारेकरी असल्याचे पोलिसांना सिद्ध करता आलेले नाही. त्यानंतर सबळ पुराव्याअभावी त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी हिरेनची नार्काे टेस्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, न्यायालयाने ती नाकारल्यामुळे ती टेस्ट बारगळली. परंतु, स्नेहलचा मारेकरी मोकाट असून, त्याला पकडण्याची मागणी जोर धरत आहे.
>अजूनही तपास सुरूच
या संदर्भात कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर म्हणाले की, ‘स्नेहल गवारे हत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरूच आहे. यातील संशियत आरोपी हिरेन राठोड याची नाकर् ाे टेस्ट करण्याची परवानगी कल्याण जिल्हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिली होती.
त्याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय दिला की, एखाद्या आरोपीची नार्को टेस्ट करताना त्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्याच निर्णयाची प्रत जोडून आरोपीच्या वकिलाने कल्याण जिल्हा प्रथम वर्ग येथे अर्ज केला आणि दिलेली परवानगी रद्द केली. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट होऊ शकली नाही.
परंतु, जनरल सायकॉलॉजिकल टेस्टमध्ये तो असंबंध बोलल्याचे मानसोपचार तज्ज्ञ यांनी सांगितले होते.