...अन् त्यांच्या आयुष्यातील धूर विरला !
By Admin | Updated: March 26, 2017 17:28 IST2017-03-26T17:28:28+5:302017-03-26T17:28:28+5:30
जिल्ह्यातील मागासलेली ४२ हजार ५५१ कुटुंबे अनुदान आणि विनातारण कर्जावर निर्धूर झाली आहे.

...अन् त्यांच्या आयुष्यातील धूर विरला !
हरी मोकाशे/ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 26 - ज्या कुटुंबात अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याची मारामार आहे, अशा दारिद्र्यरेषेखालील, आर्थिकदृष्ट्या मागास असलेले कुटुंब निर्धूर कसे असणार? स्वयंपाक करायचा म्हटले की, चुलीला लाकडाची गरज आलीच. चटकन् चूल पेटविण्यासाठी डोळे चोळत तोंडाने फुंकर घालण्याची झालेली नित्याची सवय. आता या सवयीला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेने बगल दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मागासलेली ४२ हजार ५५१ कुटुंबे अनुदान आणि विनातारण कर्जावर निर्धूर झाली आहे.
आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची माहिती क्षणार्धात खेड्यातील व्यक्तींनाही मिळू लागली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तीही मोबाईल हाताळत असल्याचे दिसत आहे. पण त्यांच्या कुटुंबात एखादा पै पाहुणा आला की, त्याला चहा, नाश्ता अथवा भोजन बनविण्यासाठी चूल पेटवावी लागते. त्यासाठी गृहिणींची सुरू असलेली खटपट आणि डोळ्यांना होणारा त्रास आलाच. ग्रामीण भागातही वृक्ष संवर्धन व्हावे आणि प्रत्येक कुटुंब निर्धूर व्हावे, यासाठी गेल्या अकरा महिन्यांपासून देशात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी सन २०११च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांची निवड करण्यात आली. लातूर जिल्ह्यात अशी ६८ हजार २४३ कुटुंबे आढळली. या कुटुंबांकडून योजनेसाठी प्रस्ताव घेण्यात आले. त्यात ५४ हजार ४३७ प्रस्ताव पात्र ठरले. त्यातील ४४ हजार ४८२ कुटुंबांच्या प्रस्तावांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि त्यातील ४२ हजार ५५१ कुटुंबांना अनुदान आणि विनातारण कर्जावर गॅस देण्यात आले आहेत.
कुटुंबास १६०० रुपयांचे अनुदान...
या योजनेअंतर्गत गॅस घेण्यासाठी सिलिंडर व रेग्युलेटरची अनामत रक्कम, बसविण्याची आणि नोंदणीची रक्कम घेतली जात नाही. त्यामुळे योजनेअंतर्गतच्या प्रत्येक कुटुंबास जवळपास १६०० रुपयांचे अनुदान मिळते. ही रक्कम केंद्र सरकार स्वत: भरत आहे.
कर्जाची परतफेड सुलभ...
या योजनेअंतर्गत गॅस घेण्यासाठी रिफिल, शेगडी व शंभर रुपयांचा मुद्रांक आवश्यक आहे. या सर्वांची साधारणत: किंमत १७०० रुपये आहे. ही रक्कम लाभार्थी तात्काळ भरू शकतो अथवा त्यासाठी कर्ज घेऊ शकतो. या कर्जाची परतफेडही सिलिंडरच्या अनुदानातून वजा केली जाते.
राज्यात लातूर आघाडीवर...
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत राज्यात लातूर जिल्हा प्रथम स्थानावर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४२ हजार ५५१ कुटुंबांंना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दुसऱ्या स्थानावर बीड जिल्हा असून, ३७ हजार कनेक्शन देण्यात आले आहेत. तर तिसऱ्या स्थानावर नांदेड असून, ३६ हजार कनेक्शन्स देण्यात आले आहेत.
३३ हजार ४४० जणांना कर्ज...
जिल्ह्यातील ४२ हजार ५५१ पैकी ३३ हजार ४४० जणांनी कर्जाद्वारे हा गॅस घेतला आहे. कर्जाच्या परतफेडीची सुविधा सुलभ असल्याने कुठलीही अडचण येत नसल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक आनंद घोडके यांनी दिली.
समन्वयामुळे राज्यात आघाडी़
लातूर जिल्ह्यातील ५० हजार मागासलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दीष्ट होते़ प्रशासकीय अधिकारी व लाभार्थ्यांच्या समन्वयामुळे अवघ्या सहा महिन्यात ४२ हजार ५५१ कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे़ राज्यात आपले काम सर्वात चांगले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव यांनी दिली़