ठाण्यात स्मार्ट पार्किंग
By Admin | Updated: July 23, 2016 03:22 IST2016-07-23T03:22:49+5:302016-07-23T03:22:49+5:30
ठाणेकर नागरिकांना मोबाइल अॅपच्या एका टचवर शहरात कुठे पार्किंग उपलब्ध आहे, याची माहिती मिळणार आहे.

ठाण्यात स्मार्ट पार्किंग
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात स्मार्ट पार्किंग व्यवस्था निर्माण व्हावी आणि ठाणेकर नागरिकांना मोबाइल अॅपच्या एका टचवर शहरात कुठे पार्किंग उपलब्ध आहे, याची माहिती मिळणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल पार्किंग सर्व्हिसेसचे प्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात महत्त्वाकांक्षी योजनेविषयी चर्चा झाली असून आॅगस्ट महिन्यातील महासभेमध्ये याविषयीचा प्रस्ताव सादर होणार आहे.
शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या आॅन रोड आणि आॅफ रोड पार्किंगची माहिती या यंत्रणेच्या माध्यमातून अॅपवर मिळणार आहे. तसेच त्या ठिकाणी किती पार्किंग जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी पार्किंगचे दर काय आहेत, याची माहितीही अॅपवर मिळणार आहे.
सुरुवातीस ज्युपिटर हॉस्पिटल येथील मोकळ्या भूखंडावर तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही स्मार्ट पार्किंग यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त संदीप माळवी, कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर, विकास ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>अॅपवरूनच देणार पार्र्किं गची फी
या यंत्रणेच्या माध्यमातून रस्त्यावरील पार्किंगचे व्यवस्थापन, मोबाइल अॅप याद्वारे शहरातील पार्किंगच्या माहितीसोबतच पार्किंगचे दर आणि त्या अॅप्सद्वारे पेमेंटची व्यवस्था असणार आहे, जेणेकरून वाहनधारकास त्याच्या अॅपवरूनच पार्किंगची फी देता येणार आहे.
या यंत्रणेद्वारे शहरातील पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. ही संपूर्ण यंत्रणा जीपीआरएसशी कनेक्ट असल्याने याची सर्व माहिती नियंत्रण केंद्राद्वारे मिळण्याची व्यवस्था आहे. शिवाय, सर्वेलन्स व्यवस्था, दंड आणि जॅमरची व्यवस्थाही या यंत्रणेशी निगडित आहे.