कॅनडाच्या मदतीने पंढरपूर बनणार स्मार्ट शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 14:26 IST2017-09-23T14:21:33+5:302017-09-23T14:26:26+5:30
कॅनडाच्या मदतीने पंढरपूर शहर स्मार्ट बनविण्याच्या हालचालींना आता वेग येत आहे़ भारत - कॅनडा मैत्रीला १५० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल कॅनडाकडून भारताला गिफ्ट मिळणार आहे़

कॅनडाच्या मदतीने पंढरपूर बनणार स्मार्ट शहर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : कॅनडाच्या मदतीने पंढरपूर शहर स्मार्ट बनविण्याच्या हालचालींना आता वेग येत आहे़ भारत - कॅनडा मैत्रीला १५० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल कॅनडाकडून भारताला गिफ्ट मिळणार आहे़ यासाठी कॅनडा सरकारने २ हजार कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार केला असून कॅनेडियन दुतावासाचे प्रतिनिधी ३ आॅक्टोबरला पंढरपूरला भेट देणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली़
भारत-कॅनडा मैत्रीचा करार झाला असून त्यांनी स्वत:हून पंढरपूरच्या विकासासाठी साहाय्य करण्याची तयारी दर्शविली असल्याबाबतचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीदिवशी पंढरपूर येथे केले होते. याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. २३) मुंबई येथे कॅनेडियन दुतावासाच्या प्रतिनिधींसमवेत एक बैठक पार पडली. या बैठकीला श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, राज्याचे मुख्य अवर सचिव प्रवीण परदेशी, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत पंढरपूर शहराच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार शहरातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदरि परिसर, शहरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, चंद्रभागेचा विकास, सांडपाण्याची व्यवस्था यासह संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्यास कॅनेडियन दुतावासाच्या प्रतिनिधींनी तत्वत: मंजुरी दिली असून, शहराची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधींचे मंडळ ३ आॅक्टोबर रोजी पंढरपूरला भेट देणार आहे. पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलून, पंढरपूरला स्मार्ट शहर बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कॅनडा सरकारच्या या प्रकल्पामुळे पंढरपूर हे देशात लवकरच स्मार्ट शहर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे.