‘स्मार्ट सिटी बेकायदेशीरच’
By Admin | Updated: December 31, 2015 01:22 IST2015-12-31T01:22:25+5:302015-12-31T01:22:25+5:30
स्मार्ट सिटीची संकल्पना ही घटनेने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या अधिकारांवर गंडांतर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज केली.

‘स्मार्ट सिटी बेकायदेशीरच’
मुंबई : स्मार्ट सिटीची संकल्पना ही घटनेने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या अधिकारांवर गंडांतर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज केली. महापालिकांचे अधिकार हाती घेण्याचा हा डाव असल्याचे ते पत्र परिषदेत म्हणाले.
केंद्र सरकारला शहरांच्या विकासाची एवढीच कळकळ असेल, तर शहरांच्या विकासासाठी निधी द्यावा. उगाच महापालिकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणे घटनाविरोधी ठरेल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने राज्य सरकारला दुष्काळ निवारणासाठी दिलेले ३ हजार ५० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी राणे यांनी केली. घोषणांचा पाऊस पाडणारे मुख्यमंत्री एकाही घोषणेची धड अंमलबजावणी करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरीत उल्लेख केला.
शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अखंड ज्योतीसाठी गॅस पुरविण्याचे आश्वासन पेट्रोलियम मंत्रालयाने दिले आहे. हा सरकारचा निर्णय आहे. त्यावर आपण बोलणे योग्य नाही. सरकारकडून गॅस पुरवठा घेण्याऐवजी शिवसेनेने स्वत: गॅससाठी खर्च करायला हवा होता. मला सांगितले असते तर मी पैसे दिले असते, असे राणे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)