स्मार्ट कार्डचा फंडा - अनेकांना गंडा
By Admin | Updated: January 25, 2015 00:55 IST2015-01-25T00:55:11+5:302015-01-25T00:55:11+5:30
स्मार्ट कार्डच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास घसघशीत लाभ मिळेल, असे आमिष दाखवून काटोल मार्गावर राहणाऱ्या अय्यर बंधूंनी अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला.

स्मार्ट कार्डचा फंडा - अनेकांना गंडा
फसवणूक : अय्यर बंधंूविरुद्ध गुन्हे दाखल
नागपूर : स्मार्ट कार्डच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास घसघशीत लाभ मिळेल, असे आमिष दाखवून काटोल मार्गावर राहणाऱ्या अय्यर बंधूंनी अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला. रवी जनार्धन अय्यर (रा. ग्रीनव्हॅली अपार्टमेंट, दुसरा माळा, काटोल रोड) आणि हरी जनार्दन अय्यर (रा. नेताजी सोसायटी, काटोल रोड) अशी आरोपींची नावे असून, अंबाझरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी अय्यर बंधूंचे धरमपेठेतील मनोरमा बिल्डिंगमध्ये तिसऱ्या माळ्यावर कार्यालय आहे. आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत आरोपी नागरिकांना फोन करून, वेगवेगळे आमिष दाखवून कार्यालयात बोलवून घ्यायचे. येथे आलेल्यांना ते लॅपटॉपवर प्रेझेंटेशन दाखवायचे. आम्ही झारखंडला जयमस इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रा. लि. नामक कंपनी सुरू केली असून, आपल्या कंपनीला प्रादेशिक परिवहन विभागाला स्मार्ट कार्ड पुरविण्याचे कंत्राट मिळाले आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास व्याजाच्या रूपाने घसघशीत लाभ मिळेल, असे तो सांगत होता. त्याने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्याच्याकडे कोट्यवधींची गुंतवणूक केली. अशाच प्रकारे गोकुळपेठेतील व्यावसायिक सुरेंद्र गयाप्रसाद शर्मा (वय ४७) आणि अन्य काही जणांनी ५ जून २०११ ते १० सप्टेंबर २०१२ या कालावधीत अय्यर बंधूंकडे गुंतवणूक केली. प्रारंभी त्याने अनेकांना व्याज म्हणून थोडी थोडी रक्कम दिली. नंतर मात्र टाळाटाळ सुरू केली.
पैशासाठी लोकांचा तगादा वाढल्यामुळे आरोपी अय्यर बंधूंनी आपले कार्यालय बंद करून पळ काढला. त्यामुळे शर्मा आणि अन्य काही गुंतवणूकदार बुधवारी अंबाझरी ठाण्यात पोहचले. पोलिसांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे अय्यर बंधूंनी ५९ लाख, ७५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)
प्रकरण गुन्हेशाखेकडे
आरोपींनी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची माहिती मिळाल्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखेकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे आता गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाचे पोलीस अय्यर बंधूंचा शोध घेत आहेत.