पाणीबचतीसाठी छोटे; पण प्रभावी उपाय
By Admin | Updated: May 18, 2016 05:17 IST2016-05-18T05:17:56+5:302016-05-18T05:17:56+5:30
लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन पाणी वाचविण्यासाठी राज्यभरातील घराघरांमध्ये आता छोट्या-छोट्या; पण प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

पाणीबचतीसाठी छोटे; पण प्रभावी उपाय
मुंबई : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन पाणी वाचविण्यासाठी राज्यभरातील घराघरांमध्ये आता छोट्या-छोट्या; पण प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. नागरिक आता उत्स्फूर्तपणे या उपायांची माहिती आपल्या परिसरातील रहिवाशांना सांगताना दिसून येत आहेत.
कोल्हापुरातील बेलबाग (मंगळवार पेठ) येथील सुलोचना आदिनाथ जाधव यांनी संक्रांतीतील सुगडींचा (खण) वापर करून त्यांनी ठिबक पद्धतीने पाणी देऊन झाडे जगविली आहेत. त्यांचा हा प्रयत्न छोटासा असला, तरी सहजपणे पाणी बचत करण्याचा संदेश देणारा आहे. शांतिनिकेतन अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या जाधव यांनी त्यांच्या फ्लॅटच्या प्रवेशद्वार, खिडक्यांमध्ये गोकर्ण, वड, लिंबू, ब्रह्मकमळ, कढीपत्ता, बेल, तुळस अशी विविध स्वरूपातील २0 झाडे कुंड्यांमध्ये लावली आहेत. या झाडांना पाणी देण्यासाठी प्रत्येक कुंडीमध्ये त्यांनी एक सुगडी ठेवून त्याला छोटे छिद्र पाडले आहे. एका सुगडीतील पाणी दिवसभर झाडांना पुरते. यासाठी त्या देवपूजेचे पाणी वापरतात. सुगडींचा वापर न केल्यास, या झाडांसाठी साधारणत: एक मोठी बादली पाणी द्यावे लागले असते, पण सुगडींचा वापर केल्याने दोन-तीन तांब्या पाणी पुरेसे होत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या पाणीबचतीचा अशा स्वरूपातील प्रयत्न करीत आहेत.
सोलापुरातील होटगी रस्त्यावर राहणारे बी. एन. वेल्हाळ यांनी जलबचतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘जलमित्र अभियानासंदर्भात ‘लोकमत’कडून विविध उपक्रम घेतले जात आहेत. त्या संदर्भातील वृत्त वाचून मी स्वत: पाणी वाचविण्यासाठी जनजागरण करीत आहे.’ सोलापुरात पाच दिवसांतून एकदा पाणी येते. पाणी आल्यानंतर शिळे झालेले पाणी ओतून देण्याकडे महिलांचा कल असतो. या वेळी वेल्हाळ हे आपल्या परिसरात फिरून पाणी न ओतण्याबाबत आवाहन करतात. स्वत:च्या घरातील चार-पाच दिवसांपूर्वीचे पाणी ते परात आणि पसरट भांड्यांमध्ये एकत्र करून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी घराच्या गच्चीवर किंवा अंगणात ठेवतात. भवानी पेठेतील सुलक्षणा पाटील यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून सांगितले की, ‘आम्ही स्टीलचे ताट-वाटी न वापरता, ‘यूज अँड थ्रो’ पत्रावळ्यांचा वापर करीत आहोत,’ असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)