सुमार हॅण्डवॉशमुळे विद्यार्थ्यांना त्रास
By Admin | Updated: August 15, 2015 00:19 IST2015-08-15T00:19:29+5:302015-08-15T00:19:29+5:30
राज्यात चिक्कीवरून गदारोळ सुरू असताना सर्व शिक्षा अभियानांतर्गत वाटण्यात आलेल्या सुमार दर्जाच्या हॅण्डवॉशने आज दुपारी अंधेरी (प) येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलच्या इयत्ता

सुमार हॅण्डवॉशमुळे विद्यार्थ्यांना त्रास
मुंबई : राज्यात चिक्कीवरून गदारोळ सुरू असताना सर्व शिक्षा अभियानांतर्गत वाटण्यात आलेल्या सुमार दर्जाच्या हॅण्डवॉशने आज दुपारी अंधेरी (प) येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलच्या इयत्ता ५ ते ७वीच्या सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांच्या हाताला खाज सुटली. या घटनेनंतर पश्चिम उपनगराच्या शिक्षण निरीक्षकांनी शाळांशी संपर्क साधून अन्य शाळांत दिलेले हॅण्डवॉश लिक्विड परत मागवून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत शाळेच्या प्राचार्या डॉ. अंजना प्रकाश यांनी सांगितले की, आजच हॅण्डवॉश वापरण्याचा पहिला दिवस होता. दुपारी जेवणाआधी या शाळेतील ५ वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांनी या हॅण्डवॉश लिक्विडने हात धुतले. लागलीच त्यांच्या हाताला खाज सुटली. तपासणीअंती लिक्विडमुळे खाज सुटल्याचे लक्षात आले. या विद्यार्थ्यांवर शाळेच्या रुग्णालयातच उपचार करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व वृद्धिंगत होण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)