झोपडपट्टी होणार जमीनदोस्त
By Admin | Updated: March 6, 2017 03:01 IST2017-03-06T03:01:08+5:302017-03-06T03:01:08+5:30
खांदा वसाहतीमधील झोपडपट्टीतील जागा रिकामी करण्याची नोटीस सिडकोने शुक्रवारी येथील रहिवाशांना बजावली आहे.

झोपडपट्टी होणार जमीनदोस्त
पनवेल : खांदा वसाहतीमधील झोपडपट्टीतील जागा रिकामी करण्याची नोटीस सिडकोने शुक्रवारी येथील रहिवाशांना बजावली आहे. बेकायदा उभारलेल्या झोपडपट्ट्या जमीनदोस्त करण्याची मोहीम सिडकोने हाती घेतली असून, ९ ते १३ मार्चपर्यंत सिडको कारवाई करणार आहे, अशी माहिती सिडकोचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील यांनी दिली आहे.
साडेसतरा एकर जागेवर झोपडपट्टी पसरली असून त्या चार भूखंडांची आजच्या बाजारभावाप्रमाणे ४०० कोटींपेक्षा जास्त किंमत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ५ जानेवारी रोजी वृत्तही प्रसिद्ध केले आहे.
खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली, तळोजे परिसरातील बेकायदा झोपडपट्टी हटविण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याशिवाय त्याचा पाठपुरावाही केला होता. सरकारची सुमारे ४०० कोटींची जागा झोपडपट्टीच्या आडून गिळंकृत करण्यात येत असल्याची तक्रारही सिडकोसह महानगरपालिकेकडे केली होती. पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देत सिडकोच्या वतीने ही कारवाई पुढे ढकलली जात होती. पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना भेटूनही झोपडपट्टी हटविण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. या वेळी डॉ. शिंदे यांनी सिडको अधिकाऱ्यांना प्राधान्याने ती मोहीम हाती घेण्यास सांगितले आहे. त्या झोपडपट्टीमधून होणारे गैरव्यवसाय सामाजिक आरोग्य बिघडवत असल्याने खांदा वसाहतीतील नागरिकांची तक्र ार होती. या झोपडपट्टीवाढीमागे राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा अनेक वर्षे रंगत आहे.
पोलीस बंदोबस्ताचा मुद्दा सिडकोने पुढे केल्यानंतर सिडकोचे अप्पर पोलीस महासंचालक विनय कोरगांवकर, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोषी, परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद माने आदींची सामाजिक कार्यकर्ती रूपा सिन्हा, कांतीलाल कडू, विजय काळे, संतोषी मोरे, जयंत भगत, अॅड. किरण घरत, माजी नगरसेवक शिवाजीराव थोरवे, राहुल रोटे यांनी बैठका घेऊन सिडको कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त आणि लागणारे कवच देण्याची तयारी दर्शविली आहे. तसे निर्देश पोलीस उपायुक्तांनी तत्काळ खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांना दिली आहे. त्यामुळे लवकरच खांदा वसाहती झोपडपट्टीमुक्त होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
अभिनायानाला हातभार
सिडको अतिक्र मण विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील, विभागीय कार्यकारी अभियंता दीपक जोगी, राठोड आदींनी खांदा कॉलनीतील बांधकाम पाडण्यासाठी अखेर मोहीम हाती घेतली असून त्याकरिता झोपडपट्टी काढून टाकण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावली आहे.
सिडकोच्या मालकीच्या सेक्टर ७, ९, ११ आणि १३मध्ये जवळपास ४०० कोटी रूपये किमतीच्या भूखंडांवर अतिक्र मण केलेले आहे. ती अतिक्र मणे काढून टाकल्यास गैरधंद्यांना आळा बसेलच, शिवाय केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला मोठा हातभार लागणार आहे.