सभागृहात अखंड महाराष्ट्राचा नारा
By Admin | Updated: July 30, 2016 03:26 IST2016-07-30T03:26:26+5:302016-07-30T03:26:26+5:30
भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकीय ठराव मांडल्याचे तीव्र पडसाद विधान परिषदेतही उमटले. अखंड महाराष्ट्राबद्दल सरकारने

सभागृहात अखंड महाराष्ट्राचा नारा
मुंबई : भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकीय ठराव मांडल्याचे तीव्र पडसाद विधान परिषदेतही उमटले. अखंड महाराष्ट्राबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे सांगत विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकीय ठराव मांडला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना नाना पटोले यांनी मांडलेला ठराव गंभीर बाब असल्याचे सांगत मुंडे यांनी लोकसभेची कामकाज पत्रिकाच सभागृहात फडकवली. तर, अखंड महाराष्ट्र हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. लोकसभेतील ही घटना अत्यंत गंभीर आहे. नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना विचारूनच ठराव मांडला असेल. यावरून अखंड महाराष्ट्राच्या विरोधात भाजपाचे कारस्थान असल्याचा वास येतो, असा हल्लाबोल मुंडे यांनी केला. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात नीलम गोऱ्हे यांनी नियम २३ अन्वये अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडला होता. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. आमच्या सर्वांच्या अस्मितेचा हा विषय असताना विधि व न्याय विभाग अस्मितेवर मत नोंदविणार काय, असा सवाल नारायण राणे यांनी केला. अखंड महाराष्ट्राच्या बाजूने याआधी अनेकदा विधिमंडळात ठराव करण्यात आले आहेत. तसेच या विषयावरील चर्चेसाठी गेल्या अधिवेशनात विधान परिषद नियम २३ अन्वये प्रस्ताव दिल्याची आठवण नीलम गोऱ्हे यांनी करून दिली. अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयाला तारीख पे तारीख न देता चर्चा करण्याची मागणी गोऱ्हे यांनी केली. अखंड महाराष्ट्रावरून सुरू असलेल्या या गदारोळात भाजपाविरुद्ध अख्खे सभाग्रह, असे चित्र निर्माण झाले होते. सभागृहातील गोंधळाच्या वातावरणामुळे सुरुवातीला १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर गोंधळ वाढतच गेल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब केल्याचे सभापतींनी जाहीर केले. (प्रतिनिधी)
अहो, मी काही पाकिस्तानात राहत नाही - सभापती
सभागृहात सभापती उभे असताना अथवा बोलत असताना अन्य कोणीही सदस्याने मध्ये न बोलण्याचा संकेत आहे. पावसाळी अधिवेशनात मात्र विरोधी बाकांवरील विशेषत: राष्ट्रवादीचे सदस्य वारंवार सभापतींचे बोलणे चालू असताना मध्येच उठून आपला विषय रेटत असल्याचे वारंवार दिसून आले. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून हा प्रकार सहन करणाऱ्या सभापतींचा शुक्रवारी मात्र कडेलोट झाला. अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर ‘अहो, मी काही पाकिस्तानात राहत नाही. मीही महाराष्ट्रातच राहतो. मला माझे म्हणणे तरी मांडू देणार आहात की नाही,’ असा संतप्त सवाल करत सभापतींनी विरोधकांना रोखले.
कवाडेंचा जय विदर्भ !
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असताना काँग्रेसचे सहयोगी सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी मात्र वेगळ्या विदर्भाचा नारा दिला. तुम्ही सर्व अखंड महाराष्ट्राचा मुद्दा मांडता तशी आमची वेगळ्या विदर्भाची मागणी आहे.
हा कोणत्या एका पक्षाचा मुद्दा नाही. नागपूर करारानुसार विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. मात्र, या नागपूर करारातील शिफारसींची पूर्तता केली जात नाही, असा आरोप कवाडे यांनी केला.
शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाची अडचण
वेगळ्या विदर्भास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. विधिमंडळात वेळोवेळी शिवसेनेने तशी भूमिकाही मांडली. विधान परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे. त्यातच शिवसेनेची त्यांना साथ आहे. गेल्या मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांसह शिवसेनेने एकत्रितपणे नियम २३ अन्वये अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव सभापतींकडे दिला आहे. विधान परिषदेच्या इतिहासात या नियमान्वये कुणीही अद्यापपर्यंत प्रस्ताव दिलेला नाही. या प्रस्तावावर मतदान घेण्याची कायद्यात तरतूद आहे. प्रस्ताव चर्चेला आल्यास विधान परिषदेत भाजपाची कोंडी होऊ शकते.