लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात गुलामांचा बाजार भरला आहे. २०० वर्षांपूर्वी चावडीवर जसे माणसांचे लिलाव व्हायचे, तसे आता सुरू आहेत. मुंबईसह कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली. हे सगळे पाहायला बाळासाहेब नाहीत, ते बरेच आहे. ते असते तर किती व्यथित झाले असते, त्यांना किती वेदना झाल्या असत्या... अशा शब्दांत मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची शुक्रवारी सुरुवात झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. आपल्या १७-१८ मिनिटांच्या भाषणात राज यांनी बाळासाहेबांसोबतच्या आठवणी सांगितल्या.
२० वर्षांपूर्वी मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्या वेदना वेगळ्या होत्या. शिवसेना सोडणे हे घर सोडण्यासारखे होते. आज २० वर्षांनंतर अनेक गोष्टी मला उमजल्या. काही गोष्टी उद्धवलाही उमजल्या असतील, झाले गेले आता एकदाचे सोडून द्या. कुठे आयुष्यभर कुंथत बसता... असे म्हणत राज यांनी जुने सगळे आपण सोडून दिले आहे, हेच स्पष्ट केले. राज यांचे भाषण सुरू असताना सभागृहात बसलेल्या रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले होते.
बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. ते कधी कुणाला समजलेच नाहीत. मला त्यांच्यावर व्याख्यान द्यायला आवडेल, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, आम्ही घरातील असून, आम्हाला बाळासाहेब समजले नाहीत. तुम्हाला कुठून कळणार? इतके ते विलक्षण नेतृत्व होते.
डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय?
निवडणुकीच्या आधी उद्धव आजारी पडले होते. मग मला सर्दी, खोकला आणि ताप येत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. माझे फॅमिली डॉक्टर यादव आहेत. यादव मराठी आहेत. मी त्यांच्याकडून औषधे घेतली आणि उद्धवना दिली. दोन दिवसांत ते बरे झाले. मी औषध घेतो आहे. सहा दिवस झाले अजून काही नाही. मी उद्धवना म्हटले, माझ्या डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय? आतापर्यंत मला लागू पडायचे औषध, ते सहा दिवस झाले तरी लागू का पडत नाही... यातली राजकीय खोच लक्षात घेताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
खराब पाने झडली, शिवसेनेला नवी पालवी फुटली : उद्धव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माझ्या शिवसेनेला नवी पालवी फुटली आहे. सडलेली, खराब पाने झडली म्हणूनच नवी पालवी फुटली. गळून गेलेल्या पानांमध्ये जीव नाही. ती काय कोणाला तरारी देणार? आपल्यासाठी धावून येणारे कोण, आपल्या जिवाचा सौदा करणारे कोण हे ओळखा, अशा शब्दात उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय भाष्य केले.
मी मुंबईत प्रत्येक शाखेत पुन्हा जाणार आहे. जिथे जिंकलो तिथे तर जाईनच; पण ज्या शाखेमध्ये पराभव झाला त्या सगळ्या ठिकाणी मी जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुसून टाकण्याचे प्रयत्न झाले. पण पक्ष संपवायला निघालेल्यांना तुम्ही जिंकून उत्तर दिले, ही आपली ताकद आहे. ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ही म्हण आज सगळीकडे असताना, आपल्या झाडाचे दांडे घेऊन आपल्यावरच प्रहार सुरू होते. तेव्हा तुम्ही चांगले लढलात असे कौतुकही उद्धव यांनी केले. शिवसेना पुसून टाका मग बघा महाराष्ट्रात काय उरते, असे आवाहन करत ठाकरे म्हणाले, मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे तेवढा जगात कोणाचा नसेल. अशा सगळ्या वातावरणात तुम्ही मुंबईचे अनेक गड आजही शाबूत ठेवले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात शुक्रवारी मुंबईत झाली. त्यावेळी राज आणि उद्धव दोघेही मंचावर एकत्र आले.
आज निसटता पराभव...
मुंबईवरील भगवा उतरवला काय मिळवले? २५ वर्षे सत्ता होती आपल्याकडे. मुंबईचे गड आजही शाबूत आहे. मुंबईकरांनी विचार करावा की मदतीला कोण येते, असे ठाकरे म्हणाले. आज निसटता पराभव झाला असे मान्य करत या पराभवाला ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट नव्हते, त्यामुळे मत कुणाला गेले ते कळले नाही, अशी टीका केली. दुबार मतदार शोधले म्हणून ११८ जागांवरच महायुतीला रोखू शकल्याचे ठाकरे यांनी सांगितले. बेरोजगारांसाठी नवा उपक्रम सुरू केल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसैनिकांना पुन्हा एकदा ‘जय महाराष्ट्र’चा उद्घोष जोरात करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
Web Summary : Raj Thackeray criticized the current political climate, likening it to a slave market. Uddhav Thackeray addressed recent election losses, emphasizing the party's resilience and plans for the future, including reconnecting with local branches and supporting the unemployed. Both leaders spoke at Balasaheb Thackeray's birth centenary event.
Web Summary : राज ठाकरे ने मौजूदा राजनीतिक माहौल की आलोचना करते हुए इसकी तुलना गुलामों के बाजार से की। उद्धव ठाकरे ने हाल ही में हुए चुनावों में हार पर बात करते हुए पार्टी के लचीलेपन और भविष्य की योजनाओं पर जोर दिया, जिसमें स्थानीय शाखाओं के साथ फिर से जुड़ना और बेरोजगारों का समर्थन करना शामिल है। दोनों नेताओं ने बालासाहेब ठाकरे की जन्म शताब्दी कार्यक्रम में बात की।