निकृष्ट माल वापरल्यानेच ‘तो’ स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 05:33 IST2016-08-05T05:33:25+5:302016-08-05T05:33:25+5:30
बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे परिक्षण कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या तज्ज्ञांनी केले

निकृष्ट माल वापरल्यानेच ‘तो’ स्लॅब कोसळला
पुणे : बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे परिक्षण कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या तज्ज्ञांनी केले असून त्यांनी दिलेल्या अहवालावरुन या गुन्ह्यात आवश्यक त्या कलमांचा समावेश केला असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील उज्वला पवार यांनी केला़
बालेवाडी येथील स्लॅब दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत़ त्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय़ पी़ लाडेकर यांच्या न्यायालयात सुरु आहे़ बुधवारी बचाव पक्षाच्या वकीलांचे युक्तीवाद झाले़ सरकारी वकील उज्वला पवार यांनी गुरुवारी आपला युक्तीवाद सुरु केला़ त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेनंतर इंजिनिअरिंग कॉलेजमधील तज्ज्ञांनी येथे येऊन बांधकामासाठी वापरलेल्या कच्च्या मालाचे परिक्षण केले़ ते निकृष्ट असल्याचा अहवाल दिला आहे़ बांधकाम व्यावसायिकांनी कंत्राटदाराशी केलेल्या करारात प्रत्येक मजल्याचे बांधकाम केल्यानंतर त्यांचा इंजिनिअर येऊन त्याची तपासणी करेल व त्यानंतर पुढील कामाला परवानगी दिली जाईल, असे म्हटले आहे़ याचा अर्थ या बांधकाम व्यावसायिकांना या ठिकाणी बांधकाम करताना दुर्घटना घडू शकते, याची कल्पना होती़
हे कामगार १४० फुटावर काम करीत होते़ त्यांना आवश्यक सुरक्षा साधने न पुरविल्यानेच त्यांचा इतक्या उंचावरुन पडून मृत्यु झाला़ हा गुन्हा अजून तपासावर आहे़ अजून दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केलेले नाही़ असे असताना पोलिसांनी त्यातील कलमे चुकीची लावली, असे म्हणता येणार नाही़ या गुन्ह्यात मृत्युमुखी पावलेल्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिल्याची प्रतिज्ञापत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत़ परंतु, त्यावर कोण नातेवाईक आहे, त्याचे पत्ते काय, तसेच त्यावर स्वाक्षरी नाही़ ही न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले़ अॅड़ पवार यांचा युक्तीवाद गुरुवारी अपूर्ण राहिला असून तो शुक्रवार सुरु करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)