बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग
By Admin | Updated: October 26, 2016 01:51 IST2016-10-26T01:51:11+5:302016-10-26T01:51:11+5:30
पुण्याच्या बालेवाडी क्र ीडा विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या

बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग
मुंबई : पुण्याच्या बालेवाडी क्र ीडा विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्र ीडापटू तयार होण्यासाठी पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठामध्ये निवासी खेळाडूंसाठी १०० टक्के अनुदान तत्त्वावर क्र ीडा महर्षी प्रा. दि. ब. देवधर क्र ीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्र ीडा विभागाच्या २००९ च्या शासन निर्णयानुसार खासगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी लागू झाली आहे. त्याच धर्तीवर देवधर प्रबोधिनीतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.
आदेशाच्या दिनांकापासून प्रत्यक्ष वेतनश्रेणी देण्यात येणार असून १ जानेवारी २००६ पासून काल्पनिकरित्या वेतनवाढ मंजूर करण्यात येणार आहे. मात्र, त्यांना या कालाविधतील कोणतीही थकबाकी देण्यात येणार नाही. या निर्णयामुळे शासनावर २४ लाख ६५ हजार रु पये इतका वार्षिक भार पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
पोलीस गृहनिर्माण मंडळावर अभियंत्यांची ७ पदे भरणार
पोलिसांना मुबलक घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळास अधीक्षक अभियंत्याची ७ पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पोलिसांना एक लाख घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळावर सोपविण्यात आली आहे. पोलीस विभागाच्या ५० किंवा त्यापेक्षा अधिक निवासस्थानांच्या निवासी इमारतीचे प्रकल्प आणि ५०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ बांधकाम असणाऱ्या प्रशासकीय इमारतींची कामे मंडळातर्फे करण्यात येणार आहे.
पोलीस गृहनिर्माणासाठी ४ चटईक्षेत्र देण्याबरोबरच खासगी क्षेत्राच्या सहभागातून (पीपीपी) प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यानुषंगाने बृहत आराखडा तयार करण्यात येत असून मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अधीक्षक अभियंत्याची (स्थापत्य) सात पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही पदे घरांची कामे चालू असेपर्यंतच असतील.
उस्मानाबादच्या निवासी आश्रमशाळेस मंजुरी
सोलापूरच्या भटके विमुक्त प्रतिष्ठानतर्फे उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगळूर (यमगरवाडी) येथे चालविण्यात येणाऱ्या ‘विजाभज’ प्रवर्गाच्या प्राथमिक आश्रमशाळेस श्रेणीवाढीद्वारे आठवीच्या वर्गासह नववी व दहावीचे वर्ग असलेली निवासी माध्यमिक आश्रमशाळा विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचा निर्णय झाला.
निवासी माध्यमिक आश्रमशाळेस २०१६-१७ पासून मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत यमगरवाडी येथे पहिली ते सातवीची आश्रमशाळा सुरू आहे. सध्याचे कर्मचारी आश्रमशाळेसाठी आवश्यक पदांची अर्हता तसेच इतर अटी व शर्ती पूर्ण करीत असतील तर त्यांचे या पदांमध्ये समायोजन करण्यात येईल.
अन्यथा अतिरिक्त कर्मचाऱ्यांमधून ही पदे भरण्यात येतील. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २६ लाख ४३ हजार १०२ रु पये तर वेतनेतर बाबींसाठी १३ लाख ६४ हजार १४५ रु पये, अशा एकूण ४० लाख सात हजार २४७ एवढ्या वार्षिक खर्चास मंजुरी देण्यात आली.