सहावीच्या मुलीने प्रियकराला पळविले!
By Admin | Updated: January 12, 2015 04:09 IST2015-01-12T03:10:59+5:302015-01-12T04:09:09+5:30
प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवित पळवून नेण्याच्या घटना नव्या नाहीत, मात्र सहावीतील विद्यार्थिनीने चक्क प्रियकराला लग्नाचे आमिष दाखवून दिल्लीतून येथे पळवून आणले

सहावीच्या मुलीने प्रियकराला पळविले!
जळगाव : प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवित पळवून नेण्याच्या घटना नव्या नाहीत, मात्र सहावीतील विद्यार्थिनीने चक्क प्रियकराला लग्नाचे आमिष दाखवून दिल्लीतून येथे पळवून आणले. पोलिसांनी या प्रेमीयुगुलास ताब्यात घेतले आहे.
दिल्लीतील सुभाषनगरच्या खयाल भागात वडिलांसह राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीचे काही दिवसांपूर्वी शेजारील रिक्षाचालक अमरचंद्र कुमार याच्यावर प्रेम जडले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याची कुणकुण मुलीच्या आईला लागली. आपले कुटुंबीय प्रेमाला विरोध करतील या भीतीने अल्पवयीन मुलीनेच तरुणाला लग्नाची मागणी घातली. सुरुवातीला नकार देणाऱ्या अमरचंद्र कुमारने नंतर लग्नास होकार दिला. अंगावरच्या कपड्यांवरच त्यांनी दिल्ली सोडली. २ जानेवारीला हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसने त्यांनी जळगाव गाठले.
त्यांनी येथील एका मंदिरात लग्न केले. अमरचंद्र कुमारने सुप्रीम कॉलनीत भाड्याची खोली घेत रोजगाराची शोधाशोध सुरू केली. औद्योगिक वसाहतीमधील एका चटईच्या कंपनीत तो कामाला लागला. तिकडे दिल्लीत मुलगी घरातून पळून गेल्यानंतर अस्वस्थ झालेल्या तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. दिल्ली पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन तपासल्यानंतर दोघे जळगावात असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर मुलीचे वडील जळगावला आले. रविवारी मुलीच्या वडिलांनी जळगावला दोघांचा शोध घेतला. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आर. टी. धारबडे यांच्या मदतीने त्यांनी दोघांना पोलीस स्टेशनला आणले. मात्र संबंधित मुलीने आपण लग्न केल्याचे सांगत वडिलांसोबत जाण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)