कर्नाटकसह गोवा राज्यात सहा पथके रवाना

By Admin | Updated: June 8, 2015 01:00 IST2015-06-08T00:57:30+5:302015-06-08T01:00:00+5:30

पानसरे हत्या प्रकरण : स्थानिक पातळीवर दोन पथके तपास करणार; संजयकुमार यांची माहिती

Six teams in Karnataka go to Goa with Karnataka | कर्नाटकसह गोवा राज्यात सहा पथके रवाना

कर्नाटकसह गोवा राज्यात सहा पथके रवाना

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा पथके शनिवारी (दि. ६) रात्रीच कर्नाटकसह गोवा राज्यांत पाठविण्यात आली आहेत. तसेच दोन पथके स्थानिक पातळीवर तपास करीत आहेत. प्रत्येकास स्वतंत्रपणे वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याची जबाबदारी सोपविली आहे, अशी माहिती ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार यांनी रविवारी दिली.
पानसरे हत्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी पोलीस मुख्यालयामध्ये आठ विशेष पथकांच्या प्रमुखांबरोबर संजयकुमार यांची बैठक झाली. पानसरे यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे (स्केचेस) एसआयटीने तयार केली आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून तयार करण्यात आलेल्या रेखाचित्रांवरून मारेकऱ्यांचा युद्धपातळीवर शोध घेण्याच्या सूचना पथकांना दिल्या असल्याचे संजयकुमार यांनी सांगितले. प्रत्येकाला स्वतंत्रपणे, वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याची जबाबदारी दिली आहे. मारेकरी सुभाषनगर रोडवरून भरधावपणे शिवाजी विद्यापीठमार्गे (पान १० वर)

कागलच्या दिशेने निघून गेले असल्याचे धीरज कन्स्ट्रक्शन येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे या मार्गावर कोठे-कोठे सीसीटीव्ही आहेत, त्यांची माहिती घेऊन त्यांचे फुटेज उपलब्ध करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. पोलिसांच्या तपासाची दिशा बदलण्यासाठी मारेकऱ्यांनी दूधगंगा नदीमध्ये दुचाकी टाकून ते परत कोल्हापुरात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर ते कर्नाटक किंवा गोवा राज्यांतही आश्रयाला जाऊ शकतात. त्यामुळे कर्नाटक व गोवा राज्यांतील काही प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्हीचे फुटेजही मिळविण्यात येणार आहे.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे तज्ज्ञ रेखाचित्रकाराकडून तयार केली आहेत. ही रेखाचित्रे राज्यभरातील सराईत गुन्हेगार, शार्प शूटर, सुपारी किलर तसेच कारागृहांत असलेल्या कैद्यांना दाखविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कर्नाटक व गोवा राज्यांत सहा पथके तळ ठोकून आहेत. त्यांच्याकडून रोजच्या तपासाची माहिती घेतली जात आहे. स्थानिक पातळीवरही दोन पथके अत्यंत बारकाईने तपास करीत असल्याचे संजयकुमार यांनी यावेळी सांगितले.

तीन सीसीटीव्हीत मारेकरी कैद
गोविंद पानसरे यांच्यावर ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्या परिसरातील तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली आहेत. त्यातील एका कॅमेऱ्यात मोटरसायकल आणि त्यावरील दोघे स्पष्टपणे
दिसतात.

Web Title: Six teams in Karnataka go to Goa with Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.