सहा दरोडेखोरांना अटक, दोन फरार
By Admin | Updated: December 27, 2014 23:53 IST2014-12-27T23:53:57+5:302014-12-27T23:53:57+5:30
साखरखेर्डा स्टेट बँक रोकड लंपास प्रकरण : २५ लाखांची रोकड जप्त.
_ns.jpg)
सहा दरोडेखोरांना अटक, दोन फरार
मेहकर (जि. बुलडाणा) : स्टेट बँकेची ३0 लाख रुपयांची रोकड पळवून नेणार्या सहा आरोपींना २७ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २५ लाख रुपये व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरोडेखोरांमध्ये एका निलंबित पोलिसाचा समावेश आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेची रोकड नेणारी व्हॅन अडवून दरोडेखोरांनी ३0 लाख रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारला घडली होती. पोलिसांनी युद्धपातळीवर तपास मोहीम राबवून परिसराची नाकेबंदी केली होती. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी या प्रकरणातील आरोपी लहू ऊर्फ लकी पंडित जाधव यास भुमराळा, चांगेफळ आणि वझर सरकटे शिवारातून पाठलाग करत पकडण्यात आले होते. त्यानंतर दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या सात पथकांनी रात्रभर भुमराळा, वझर सरकटे जंगलात पाळत ठेवली. दरम्यान, २७ डिसेंबर रोजी आकाश थेटे व सुदर्शन थेटे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. जालना येथील निलंबित पोलीस कर्मचारी शिवाजी भागडे, बोक्या ऊर्फ गोविंद डोंगरे व ज्ञानेश्वर ऊर्फ बालाजी खरात या तीन आरोपींना नाशिक येथे शनिवारला सकाळी ६.३0 वाजेदरम्यान रेल्वे स्टेशनवरून गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले, तर या प्रकरणातील मदन भागडे व त्याचा एक साथीदार असे दोन आरोपी मुंबईकडे फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, भुमराळा जंगलातून पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या रोकडसह इतर साहित्यही हस्तगत केले आहे.