सहा शेतकऱ्यांच्या मराठवाड्यात आत्महत्या
By Admin | Updated: September 29, 2015 01:56 IST2015-09-29T01:56:51+5:302015-09-29T01:56:51+5:30
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी सहा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यात बीड जिल्ह्यातील तीन, जालना जिल्ह्यातील दोन

सहा शेतकऱ्यांच्या मराठवाड्यात आत्महत्या
औरंगाबाद : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी सहा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यात बीड जिल्ह्यातील तीन, जालना जिल्ह्यातील दोन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश आहे.
पैठण तालुक्यातील एकतुनी गावात रविवारी अर्जुन शंकर राजकर (३५) याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शेतात दरवर्षी कपाशी, तूर, बाजरीचे पीक घेत असत़ चार वर्षांपासून त्यांच्या शेतात काहीच पिकत नाही. घरची गरीब परिस्थिती, त्यात बँकेचे कर्ज वाढत होते. रविवारी गणेश विसर्जनाची तयारी सुरू तर राजकर यांनी आत्महत्या केली.
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील उद्धव बबनराव ढेरे (३५) या शेतकऱ्याने सोमवारी जीवनयात्रा संपविली. सकाळी ते दुध आणण्यासाठी शेतात गेले व तिथेच विषारी द्रव प्राशन केले. बदनापूर तालुक्यातील (जि. जालना) धोपटेश्वर येथील निवृत्ती ज्ञानदेव शेळके (३५) यांनी रविवारी दुपारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना दीड एकर शेती असून खाजगी व बँकेचे कर्ज होते.
तांदळवाडी (ता. बीड) येथे दादासाहेब गणपतराव सांगूळे (६५) यांनी शनिवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना तीन एकर शेती होती; परंतु त्यांनी ती विकली होती. मोलमजुरी करुन ते उदरनिर्वाह करत. दुसरी घटना चव्हाणवाडी (ता. गेवराई) येथे घडली. गिन्यानदेव रामभाऊ चव्हाण (४५) या शेतकऱ्याने सोमवारी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना एक एकर शेती आहे. आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील ताराबाई मुंजाबापू महाडिक (६५) या शेतकरी महिलेने घाटापिंप्री येथे माहेरी आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक व खासगी सावकाराचे कर्ज होते. त्यांनी माहेरी येऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.