देशातील परिस्थिती घातक पण परिवर्तनासाठी अनुकूलही
By Admin | Updated: January 1, 2015 01:26 IST2015-01-01T01:26:35+5:302015-01-01T01:26:35+5:30
सध्या देशात धर्मांध शक्तींनी सत्ता हस्तगत केली आहे. देशातील एकूण परिस्थिती पाहता अतिशय घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ही प्रतिकूल परिस्थिती जितकी घातक आहे, तितकीच

देशातील परिस्थिती घातक पण परिवर्तनासाठी अनुकूलही
स्मृती व्याख्यानमाला : माकपा नेते कुमार शिराळकर यांचा विश्वास
नागपूर : सध्या देशात धर्मांध शक्तींनी सत्ता हस्तगत केली आहे. देशातील एकूण परिस्थिती पाहता अतिशय घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ही प्रतिकूल परिस्थिती जितकी घातक आहे, तितकीच ती परिवर्तनाच्या चळवळीसाठी अनुकूल सुद्धा आहे, असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य कॉ. कुमार शिराळकर यांनी आज येथे व्यक्त केला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे बुधवारी हिंदी मोरभवन येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक जिल्हा सचिव कॉ. बी.पी. कश्यप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ५० वर्षे’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. पक्षाचे जिल्हा कमिटीचे सदस्य गोपाल दा चॅटर्जी अध्यक्षस्थानी होते.
कॉ. शिराळकर यांनी सुरुवातीलाच कम्युनिस्टांच्या १०० वर्षातील जागतिक आंदोलनाचा आढावा सादर केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची देशात अनेक राज्यात सत्ता होती. परंतु आज परिस्थिती काय आहे. आम्ही कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या वैचारिकतेशी फारकत घेतल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळेच धर्मांध शक्तींना फोफावता आले, हे आम्ही मान्य करायलाच हवे. आज देशात धर्मांध शक्तींद्वारे जे काही सुरू आहे ते अतिशय धोकादायक आहे. परंतु ही परिस्थिती कितीही घातक असली तरी खचून जाण्याची गरज नाही. याचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी आम्हालाही आक्रमक व्हावे लागेल. यासाठी आमच्या बोथट झालेल्या राजकीय वैचारिक धारेला पुन्हा-पुन्हा घासून-घासून पूर्ववत करण्याची गरज आहे. त्यासाठी कम्युनिस्टांना पुन्हा समाजात लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल. आमच्या नेत्यांनी काही कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार काम करावे लागेल. शेतकरी, दलित यांचे प्रश्न कायम आहे. त्या प्रश्नावर त्यांच्या शोषणाविरोधातील लढा आपलासा करावा लागेल. भांडवलदारांकडून निसर्गाचेही होणाऱ्या शोषणाविरोधातील लढ्याबाबतही कम्युनिस्टांनाही विचार करावा लागेल. समाजातील परिवर्तनवादी सर्व शक्तींना सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई लढावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोपाल दा चॅटर्जी यांनी अध्यक्षीय भाषणात कम्युनिस्ट चळवळीचा आढावा घेतला. मनोहर मुळे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)