साहेब, आता तरी वाइटाला वाईट म्हणा...

By Admin | Updated: November 16, 2014 23:45 IST2014-11-16T23:41:53+5:302014-11-16T23:45:33+5:30

मुक्त चिंतन : मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना

Sir, nowadays say bad to the evil ... | साहेब, आता तरी वाइटाला वाईट म्हणा...

साहेब, आता तरी वाइटाला वाईट म्हणा...

जहाँगीर शेख - कागल -गाव तीनशे मतांचं आणि तिथे मुश्रीफांना सहा बैठका घ्याव्या लागतात; कारण गटातच इतके गट.. निवडणुकीसाठी सर्व सामग्री दिली; पण जनतेपर्यंत पोहोचली काय? विरोधक काही तरी मुद्दे काढून जनतेला चिथावणाच; पण याबद्दल त्यांना जाब विचारण्याची धमक आमच्या कार्यकर्त्यांनी दाखविली काय? एक पांढरा शर्ट घातला, मोबाईल कानाला लावला की झाला पुढारीऽऽ चालला कागलला, कोल्हापूरला, साहेबांना भेटायला. साहेब, आता तरी चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणा आणि एकवेळ चुकू दे, पण निर्णय घ्याऽऽ अशा शब्दांत मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. मेळावा होता आभाराचा; पण हे मुक्त चिंतन केले कार्यकर्त्यांनी.
निकालानंतर महिना होत आल्यानंतर हा मेळावा कागल येथे घेण्यात आला. अपेक्षेप्रमाणे कार्यकर्ते बोलले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना पाठबळ दिले. अवकाळी पावसामुळे ऐनवेळी जागा बदलल्याने गैरसोय होऊनही कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते ते या गटाच्या विधानसभेतील कामगिरीचा पंचनामा ऐकण्यासाठी. या कार्यकर्त्यांनी थेट मुश्रीफांनाही खडे बोल सुनावत कार्यपद्धतीत बदल करण्याची विनंती केली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी सुरुवातीलाच विचारले की, आज या मेळाव्यात कोण कोण बोलणार. त्यानंतर अनेकजण म्हणाले, ‘नाही, आज फक्त ऐकणार! हे जर चार-पाच वर्षे केले असते तर लिड वाढलं असतं.’
संजय हेगडे, राजेंद्र पाटील, बाळासाहेब फराकटे, संदीप मगदूम, सूर्याजी घोरपडे, सूर्यकांत पाटील, काशीनाथ तेली, शिवाजी खोत, भैया माने, रणजितसिंह पाटील या कार्यकर्त्यांनी सडेतोडपणे भावना मांडून एकूण निकालाचा पंचनामा केला.

मुश्रीफांनाही खडे बोलऽऽऽ
साहेबऽऽ तुम्हीबी विरोधी पार्टीच्या लोकांची चोरून कामे करणे बंद करा. करायचीच असतील तर त्या त्या गावातील आपल्या एखाद्या तरी कार्यकर्त्याला सांगून करा; कारण कामे करून घेऊनही हे लोक उलटा प्रचार करतात आणि आम्हीही त्यांना विचारू शकत नाही. विचारले तर म्हणतात, माझं काम वरनं झालंय, तुझा काय संबंध? कंत्राटदार आणि कार्यकर्ता-नोकरदार, पदाधिकारी यांच्यात फरक करा... अशा शब्दांत मुश्रीफांनाही खडे बोल सुनावण्यात आले.

भलेही आमदारकी नसेल तर चालेल...
या मेळाव्यात मुश्रीफांनीही स्पष्टपणे भावना व्यक्त करताना सांगितले की, मंत्रिपदामुळे बऱ्याच गोष्टी करता येत होत्या; पण आता मर्यादा येत आहेत. मतदारसंघात दृष्ट लागण्यासारखा गट आपण बांधला आहे. गावागावांत चांगले वागा, आपल्याबद्दल नाराजी होऊ देऊ नका. भलेही मला आमदारकी मिळाली नाही तरी चालेल, पण योग्य असेच काम करा. मी पण कठोर होण्याचा प्रयत्न करेन. चांगल्याला चांगले म्हणेन... माझा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करेन.

Web Title: Sir, nowadays say bad to the evil ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.