सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 02:22 IST2016-07-31T02:22:22+5:302016-07-31T02:22:22+5:30
सायन-पनवेल मार्गावर तुर्भे येथील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी कायम
नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर तुर्भे येथील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. खड्ड्यातून वाहन चालवणे अवघड होत असल्यामुळे वाहनांची गती मंदावून सुमारे दोन ते अडीच किलोमीटरच्या रांगा लागत आहेत. यामुळे त्या ठिकाणची वाहतूककोंडी सोडवण्यात पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे.
अवघ्या पहिल्याच पावसाने सायन-पनवेल मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गतवर्षी बांधलेल्या पुलांची देखील यंदाही पावसामुळे चाळण झालेली आहे. तर तुर्भे येथील रस्त्यावरील खड्ड्यांमधून मार्ग काढत वाहन चालवताना चालकांची कसरत होत आहे. परिणामी वाहनांची गती मंदावून एकापाठोपाठ एक वाहनांच्या सुमारे दोन ते अडीच किलोमीटरच्या रांगा लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भेतील कार्यालयासमोरील पूल देखील त्यातून सुटलेला नाही. यावरून सदर मार्गाच्या कामाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात त्या ठिकाणी खड्डे पडत असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाय निघालेला नाही. यामुळे गतवर्षाप्रमाणेच सायन-पनवेल मार्गावर सानपाडा, तुर्भे, शिरवणे तसेच सीबीडीदरम्यान खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. या मार्गावरून शुक्रवार ते सोमवार मोठ्या प्रमाणात रहदारी असते. सुटीची संधी साधून अनेक जण खासगी वाहनातून मुंबईबाहेर पूणेच्या दिशेने धाव घेतात. तेच मुंबईकर पुन्हा रविवारी अथवा सोमवारी मुंबईला परत येतात. नेमके त्याच वेळी वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडी होत आहे. यामध्ये रुग्णवाहिका देखील अडकल्या जात असल्यामुळे ही वाहतूक कोंडी एखाद्या रुग्णाचे प्राण घेण्याची देखील शक्यता आहे.
सततच्या वाहतूककोंडीमुळे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली आहे. मार्गावरील खड्डे बुजवून वाहतूक कोंडी टाळावी, असे वाहतूकपोलिसांनी देखील सूचित केले आहे. परंतु पाऊस थांबला की डागडुजीचे काम हाती घेतले जाईल, हेच आश्वासन त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. (प्रतिनिधी)