‘एकच पर्व, बहुजन सर्व’!,बहुजन क्रांती मोर्चाप्रसंगी परिवर्तनाचा नारा

By Admin | Updated: January 18, 2017 21:09 IST2017-01-18T21:09:49+5:302017-01-18T21:09:49+5:30

केवळ मोर्चे काढून काहीच साध्य होत नाही तर मोर्चातून परिवर्तन व्हायला हवे़. राज्यभरात निघालेल्या बहुजन मुक्ती मोर्चांमुळे मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र ओबीसी मंत्रालय उभारण्याची घोषणा करावी लागली.

'Single Feast, Bahujan All'!, Revolution Slogan for the Bahujan Kranti Morcha | ‘एकच पर्व, बहुजन सर्व’!,बहुजन क्रांती मोर्चाप्रसंगी परिवर्तनाचा नारा

‘एकच पर्व, बहुजन सर्व’!,बहुजन क्रांती मोर्चाप्रसंगी परिवर्तनाचा नारा

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 18 - केवळ मोर्चे काढून काहीच साध्य होत नाही तर मोर्चातून परिवर्तन व्हायला हवे़. राज्यभरात निघालेल्या बहुजन मुक्ती मोर्चांमुळे मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र ओबीसी मंत्रालय उभारण्याची घोषणा करावी लागली. हे बहुजन मुक्ती मोर्चाचे यश असल्याची स्पष्टोक्ती भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिली़. यावेळी उपस्थित समर्थक कार्यकर्त्यांनी एकच पर्व बहुजन सर्व अशा घोषणा देत परिसर दाणाणूण सोडला.
येथील बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीतर्फे बुधवारी सकाळी १० वाजता बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़. त्या वेळी आयोजित जाहीर सभेत वामन मेश्राम बोलत होते.
मान्यवरांचे मार्गदर्शन
धुळे जिल्हा कारागृहासमोर झालेल्या या सभेला क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक मनोज महाले, जिल्हा संयोजक महादेव जमदाडे, ज्येष्ठ नेते एम़जी़ धिवरे, जुबेर शेख, हारुण अन्सारी, भाऊसाहेब सोनवणे, वसंत गुंजाळ (राष्ट्रीय उपाध्यक्ष, वडार समाज), संजय कुसळकर, तानाजी तडवी (आदिवासी कार्यकर्ते), नामदेव येळवे (कोळी समाज), रावसाहेब पाटील (माजी सरपंच, बेटावद), अ‍ॅड़ संतोष जाधव, विजय सोनवणे, आनंद शिंदे (राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ), गोपाल माने, अजहर हुसैन (जमात-ए-इस्लामी), राजेंद्र पाटील, साहेबराव गोसावी (भटके विमुक्त समाज) यांच्यासह विविध मान्यवरांनी मोर्चाला उपस्थित नागरिकांना संबोधित करीत समाज जनजागृतीसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे उद्देश व ध्येयधोरणांविषयी माहिती दिली, तसेच सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. 
झेंडे, घोषणांचे फलक
मोर्चात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना आयोजकांकडून टोप्या, झेंडे व मागण्यांचे फलक वितरित करण्यात आले़ पिवळे, लाल, हिरवे व निळे झेंडे नागरिकांकडे होते़ फलकांवर ‘महिलांवरील अत्याचार थांबवा’, ‘उठ बहुजना जागा हो, संघर्षाचा धागा हो’, ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ या घोषणा होत्या.
राज्य सरकारचे हे षड्यंत्र
वामन मेश्राम या वेळी म्हणाले की, राज्य सरकारने मराठा व दलित समाजात फूट पाडण्यासाठी त्यांच्या मोर्चांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला़ संघ परिवाराने यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली़ त्यामुळेच बहुजनांचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला़ हा मोर्चा मराठ्यांविरुद्ध नसून परिवर्तनासाठी आहे़ १०८ वर्षांच्या संघर्षानंतर बहुजन समाजाला बोलण्याचे स्वातंत्र्य मिळालेले असताना मूकमोर्चे काढून आपण आपल्याच महापुरुषांचा अवमान करीत आहोत, असे मेश्राम म्हणाले़ मुख्यमंत्र्यांनी मराठा व ओबीसींमध्येदेखील फूट पाडण्याचा प्रयत्न केला़ इंग्रजांनी केवळ दोन धर्मात फूट पाडली, मात्र मुख्यमंत्री प्रत्येक जातीत फूट पाडत असल्याची टीका मेश्राम यांनी केली़.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जिल्हा कारागृहासमोर जाहीर सभा सुरू असतानाच पदाधिकारी व समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले़. शिष्टमंडळात प्रा़महादेव जमदाडे, कस्तुराबाई भिल, ईश्वर निहाळे, निर्मला निहाळे, छाया पाटील, गुरफान शेख, कैलास माळी, अण्णा बोरकर व जगदीशराजे शिंदे यांचा समावेश होता़ त्यातील काही नागरिक विविध घटनांतील पीडितांचे नातेवाईक होते़ दरम्यान, जाहीर सभेत एका महिलेनेही व्यासपीठावर येऊन भूमिका मांडली़.

Web Title: 'Single Feast, Bahujan All'!, Revolution Slogan for the Bahujan Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.