राज्यात एकाच दिवसात दहा ‘पाऊसबळी’

By Admin | Updated: June 27, 2016 05:12 IST2016-06-27T05:12:24+5:302016-06-27T05:12:24+5:30

मान्सूनच्या धुवाधार पावसाने राज्याला दिलासा दिला असतानाच, ‘पाऊसबळीं’ची संख्याही वाढू लागली आहे.

In a single day, ten 'rain-fed' | राज्यात एकाच दिवसात दहा ‘पाऊसबळी’

राज्यात एकाच दिवसात दहा ‘पाऊसबळी’


मुंबई : मान्सूनच्या धुवाधार पावसाने राज्याला दिलासा दिला असतानाच, ‘पाऊसबळीं’ची संख्याही वाढू लागली आहे. त्यातच पावसाळी वातावरणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पाण्यात डुंबणेही अनेकांच्या जिवावर बेतले आहे. गेल्या चोवीस तासांत गडचिरोली, अहमदनगर आणि ठाणे-मुंबईतील विविध ठिकाणी बुडून तब्बल १० जणांचा बळी गेला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळच्या मोठे वेणगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा रविवारी दुपारी तलावात बुडून मृत्यू झाला. भूषण संजय गवळे (१५, इ. दहावी), तेजस सिद्धार्थ गवळे (१५, दहावी), आशिष मोहन गवळे (१२, सातवी) अशी या चुलत भावंडांची नावे असून, दुपारी ते वनखात्याच्या हद्दीत तलावात पोहण्यास उतरले होते, परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाले. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून उपचारार्थ नेईपर्यंत उशीर झाला होता.
तसेच वाशिमहून आठ दिवसांपूर्वी मूल येथे मामाकडे राहायला आलेल्या तरुणासह दोन मुलांचा रविवारी दुपारी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. कुटुंबीयांसह मामा प्रशांत अप्पलवार मार्कंडा येथे देवदर्शनाला आले होते. या वेळी आंघोळीसाठी वैनगंगेच्या पाण्यात उतरलेल्या अंकुर प्रशांत पाठक (२२), वैभव प्रशांत पाठक (१६) आणि गणेश प्रशांत अप्पलवार (१३) यांचा बुडून मृत्यू झाला. त्याचबरोबर अहमदनगरमधील कुळधरण (ता. कर्जत) येथील शेततळ्यात पोहायला गेलेल्या गौरव बापू गुंड (६, इ. पहिली) व सच्चुत गुलाब गुंड (१०, इ. चौथी) या मुलांचाही रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. सहा-सात फूट खोल शेततळ्यात गौरव-सच्चुत गटांगळ्या खाऊ लागल्यावर शेतात काम करणाऱ्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेले, परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही.
मुसळधार पाऊस सुरू असताना शनिवारी दुपारी वीजबिल भरण्यासाठी गेलेली मुंबईतील भांडुप, प्रताप नगर येथील वृद्धा नाल्यात पडून वाहून गेली होती. सुलोचना भालेराव (७०) असे तिचे नाव असून, रविवारी दुपारी नाल्यात तिचा
मृतदेह तरंगताना आढळला. तसेच मुलुंड संभाजी नगर परिसरातील इस्माईल शेख (३०) हाही शनिवारी बकऱ्यांना चारा देण्यासाठी गेला असता लाल बहादूर
शास्त्री मार्गावरील नाल्यात वाहून गेला
होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>गटांगळ्या खाणाऱ्या कुटुंबाला वाचविण्यात यश
मुंबईतील वर्सोवा किनाऱ्याजवळच्या समुद्रात गटांगळ्या खात असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले.मनीष आर्या (४३), पत्नी शरयू (४३) आणि मुलगा निर्मित (११) हे रविवारी दुपारी पावसाची मजा घेण्यासाठी समुद्रातील खडकांत उभे असताना अचानक पाण्याची पातळी वाढून गटांगळ्या खाऊ लागले. मात्र फायर रेस्क्यू टीमने तातडीने मदतीला धावून त्यांना पाण्याबाहेर काढले.

Web Title: In a single day, ten 'rain-fed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.