गायक अभिजित बरळला
By Admin | Updated: May 7, 2015 02:03 IST2015-05-07T02:03:24+5:302015-05-07T02:03:24+5:30
कुत्रे रस्त्यावर झोपले तर ते मरणारच. रस्ते हे गरिबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते, म्हणून मी कधी रस्त्यावर झोपलो नाही,’ असे वादग्रस्त ट्विट अभिजितने केले आहे.

गायक अभिजित बरळला
मुंबई - गायक अभिजित भट्टाचार्यने केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कुत्रे रस्त्यावर झोपले तर ते मरणारच. रस्ते हे गरिबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते, म्हणून मी कधी रस्त्यावर झोपलो नाही,’ असे वादग्रस्त ट्विट अभिजितने सलमान खानच्या हिट अॅण्ड रन खटल्याच्या निमित्ताने मंगळवारी केले. ‘फुटपाथवर झोपण्याची फार हौस असेल, तर अशा लोकांनी गावी जावे. तिथे कोणतीही गाडी अंगावर येणार नाही. रस्ते गरिबांच्या बापाचे नाहीत,’ असेही अभिजितने म्हटले आहे.
-----------
चौथा भिडू - संजय दत्त, शायनी, जॉन अब्राहम आणि आता सलमान!
संजय दत्त, शायनी आहुजा आणि जॉन अब्राहमनंतर सलमान खान हा न्यायालयाने आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा ठोठावलेला चौथा चित्रपट अभिनेता आहे.
संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या आरोपात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. संजय सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे.
शायनी आहुजाला न्यायालयाने घरकाम करणाऱ्या महिलेवरील बलात्काराच्या आरोपात दोषी ठरविले होते. त्याला बराच काळ कारागृहाच्या भिंतीआड राहावे लागले. तूर्तास शायनी जामिनावर बाहेर असून, प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे.
जॉन अब्राहमला खार भागात वेगाने गाडी चालवून अपघात केल्याच्या आरोपात दोषी ठरविण्यात आले होते. नंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला. सलमानला मुंबईच्या सत्र न्यायालयाने बुधवारी ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात
दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
------------------
बहुचर्चित ‘हिट अॅण्ड रन’
संजीव नंदा - १० जानेवारी १९९९ दिल्ली येथील संजीव नंदा यांच्या गाडीखाली ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन पोलिसांचा समावेश होता. या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाकडून नंदाला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
अॅलिस्टर परेरा - १२ नोव्हेंबर २००६ मुंबईतील एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा अॅलिस्टर परेरा. २५ वर्षांच्या अॅलिस्टरने दारूच्या नशेत गाडी चालवून १५ कामगारांना गाडीच्या खाली चिरडले होते. यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयात अॅलिस्टरला ३ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड या शिक्षेवर सर्वाेच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
नुरिया हवेलीवाला - ३० जानेवारी २०१० परदेशी ब्युटिशियन नुरिया हवेलीवाला मलबार हिल येथील फ्लॅटमध्ये मित्र - मैत्रिणींबरोबर पार्टी करीत होती. पार्टीत दारून पिऊन अजून दारू आणण्यास बाहेर पडलेल्या नुरियाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने २ जणांचा मृत्यू, तर ३ जखमी झाले होते. तिला ५ वर्षांची शिक्षा व ५ लाखांचा दंड झाला होता.