सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक ठेवा धोक्यात
By Admin | Updated: June 21, 2014 00:01 IST2014-06-20T23:52:15+5:302014-06-21T00:01:49+5:30
पुरातत्व विभाच्या दुर्लक्षामुळे सिंदखेडराजा परिसरातील पुरातन वास्तु शेवटची घटका मोजत आहे.

सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक ठेवा धोक्यात
काशिनाथ मेहेत्रे/ सिंदखेडराजा
पुरातन वास्तु जपण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. तसेच निधीही देण्यात येतो. परंतु पुरातत्व विभागाकडून निधीचा योग्य वापर होत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील ऐतिहासीक ठेवा धोक्यात आला आहे.
राजमाता जिजाऊंच्या नावाने ओळखल्या जाणार्या सिंदखेडराजा तालुक्याला पुरातन वारसा लाभलेला असून अनेक पुरातन वास्तु आहेत. परंतु पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील पुरातन वास्तु शेवटची घटका मोजतांना दिसून येत आहेत. येथील मोती तलाव, चांदणी तलाव, दगडी बांधकाम केलेल्या पुरातन वास्तु देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी शासनाच्या पुरातत्व विभागाकडे आहे. मोती तलावाच्या दगडी भिंतीवर लिंब, चिंच, पिंपळ, वड अशा अनेक प्रकारचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे दगडी भिंतीला मोठमोठे तडे गेले आहेत. मोती तलावाची दुरुस्ती करण्यासाठी पुरातत्च खात्याकडे निवेदनाद्वारे मागणीही केली आहे.
अद्यापपर्यत पुरातत्व खात्याने मोती तलावाच्या भिंतीवरील एकही झाड नष्ट केले नाही. त्यामुळे मोती तलावाची भिंत ढासाळण्याची दाट शक्यता आहे. येथील जागृत रामेश्वर मंदिर देवस्थान हे सिंदखेडराजा वासियांचे आराध्य दैवत मानले जाते. दररोज येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर याठिकाणी मोठय़ा प्रमाणात विवाह पार पडत होते.
परंतु पुरातत्व विभागाने जागृत रामेश्वर मंदिर देवस्थानवर विवाह करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला.