‘स्वदेश भ्रमण’साठी सिंधुदुर्गची निवड
By Admin | Updated: April 8, 2015 00:59 IST2015-04-08T00:57:04+5:302015-04-08T00:59:33+5:30
केंद्र शासनाची योजना : आर्थिक वर्षात १00 कोटींची तरतूद; राज्यातील एकमेव जिल्हा

‘स्वदेश भ्रमण’साठी सिंधुदुर्गची निवड
सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या ‘स्वदेश भ्रमण’ या पर्यटन विकासासाठी असणाऱ्या योजनेत महाराष्ट्रातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागाचा विकास केला जाणार आहे. यासाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने १०० कोटींची तरतूद केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्र शासनामार्फत यावर्षीपासून पर्यटन विकासासाठी ‘स्वदेश भ्रमण’ ही नवीन योजना तयार केली असून, या योजनेंतर्गत राज्यातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश केला आहे. या योजनेंतर्गत तीन वर्षासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने वर्षाला १०० कोटी याप्रमाणे केंद्र शासनामार्फत निधी दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात म्हणजेच सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, हा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर असणाऱ्या भागाच्या विकासावर खर्च केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांचे केले अभिनंदन
सन २०१४-१५ या वर्षाकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता, निधी वितरण व सनियंत्रण ठेवण्याचे काम यशस्वी करून जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांनी शंभर टक्के निधी खर्च केला. त्याबद्दल जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी सर्व यंत्रणांचे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांचे अभिनंदन केले आहे. सन २०१५-१६ चेही उत्कृष्ट नियोजन करून आगामी वर्षातही जिल्हा नियोजनाची कामे उत्कृष्टपणे पार पाडावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी सर्व यंत्रणांना केले आहे.
टप्प्याटप्प्याने मिळणार ३०० कोटी
महाराष्ट्रातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘स्वदेश भ्रमण’ या योजनेत समावेश केल्याने जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यालगत असणाऱ्या बाबींचा विकास करण्यासाठी तीन वर्षांमध्ये ३०० कोटी रुपये मिळणार आहेत. सन २०१५-१६ - १०० कोटी, २०१६-१७ - १०० कोटी व २०१७-१८ - १०० कोटी अशा तीन टप्प्यांत हा निधी मिळणार आहे. या ३०० कोटींतून जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीचा विकास होणार आहे.
सागर किनारपट्टी होणार विकसित
सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटर लांबीचा स्वच्छ व नितळ समुद्रकिनारा लाभलेला असून, याठिकाणी पर्यटनदृष्ट्या विकास झालेला दिसून येत नाही. केंद्र शासनाकडून ‘स्वदेश भ्रमण’ या योजनेतून सिंधुदुर्गला समुद्र किनारपट्टीच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी मिळणार आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटनस्थळी सोयी-सुविधा या निधीतून केल्या जाणार आहेत.