एकाच वेळी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांविरुद्ध मोक्का
By Admin | Updated: July 9, 2016 23:11 IST2016-07-09T23:11:46+5:302016-07-09T23:11:46+5:30
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) शहर पोलिसांनी एकाच वेळी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर कारवाई केली. पोस्टर गँगचा युवराज माथनकर आणि त्याच्या

एकाच वेळी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांविरुद्ध मोक्का
पोलिसांचा गुन्हेगारांना दणका : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
नागपूर : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) शहर पोलिसांनी एकाच वेळी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर कारवाई केली. पोस्टर गँगचा युवराज माथनकर आणि त्याच्या साथीदारांवर हुडकेश्वर ठाण्यात दाखल गुन्ह्यांवरून तर इमामवाड्यात नगरसेवक गुड्डू ऊर्फ योगेश तिवारी यांच्या घरावर सशस्र हल्ला चढवणारा कुख्यात गुन्हेगार आशिष फेलिक्स ऊर्फ टकल्या आणि त्याचे साथीदार या त्या दोन टोळ्या होय. अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास वारके, गुन्हे शाखेचे रंजनकुमार शर्मा आणि उपायुक्त जी. श्रीधर यांनी एका पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली.
मंगळवारी ५ जुलैला हुडकेश्वर(दिघोरी)च्या सर्वश्रीनगरातील प्रॉपर्टी डीलर सारंग अवथनकर यांच्या घरी युवराज माथनकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी हैदोस घातला होता. हेमंत पंजाबराव गावंडे, विशाल मिलिंद वासनिक, आशिष अशोक कानतोडे, युवराज माथनकर, शक्ती संजू मनपिया आणि रवी उमेश उमाठे या सशस्त्र गुंडांनी सारंगच्या घरावर हल्ला चढवला.
७ जुलै रोजी सारंगचे लग्न तत्पूर्वी ६ जुलै रोजी हळदीचा कार्यक्रम असल्याने त्याच्या सर्वश्रीनगर येथील घरात २५ ते ३० नातेवाईक उपस्थित होते. त्यांना धमकावून शिवीगाळ करून आरोपींनी गप्प केले. युवराज व हेमंतने पिस्तूल कानशिलावर लावून सारंगला मारहाण केली. त्याला दहा लाखांची मागणी केली. महिलांशी असभ्य वर्तन केले. पैसे न दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यानंतर आलमारीतील दोन लाखाचे दागिने तसेच रोख दीड लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाले. सारंगच्या तक्रारीवरून पोलिसांनी माथनकर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून दीड लाखाची रोकड, १ लाख ३५ हजारांचे दागिने, महागड्या कारसह २६ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल आणि तलवार जप्त केली. पिस्तूल मात्र सापडले नाही. युवराज नुकताच मोक्काच्या एका दुसऱ्या प्रकरणातून जामिनावर बाहेर आला आणि त्याने लगेच हा गुन्हा केल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आशिष रॉबर्ट फेलिक्स याच्या टोळीवरील मोक्का कारवाईची माहिती देताना ते म्हणाले, १ जुलैला सकाळी ११ च्या सुमारास आशिष रॉबर्ट फेलिक्स आणि त्याच्या टोळीतील सशस्त्र गुंडांनी नगरसेवक योगेश ऊर्फ गुड्डू श्रीकांत तिवारी यांच्या जनसंपर्क कार्यालयावर हल्ला चढवला, हप्ता वसुलीसाठी शिवीगाळ करीत जीवे मारण्याचीही धमकी दिली. इमामवाडा पोलिसांनी गुड्डू यांचे भाऊ शैलेश तिवारी यांच्या तक्रारीवरून आरोपी आशिष रॉबर्ट, मारोती भाऊराव दुधमोगरे, आकाश ताराचंद्र बंजारे, गणेश ऊर्फ सानू सुरेश चंदेल, प्रशांत सुभाषराव कांबळे, संदेश भीमराव खोब्रागडे आणि अर्चित नरेश भावे यांच्यावर गुन्हा दाखल केला. कुख्यात आशिषविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दुधमोगरेविरुद्ध एक, आकाशविरुद्ध तीन, संदेशविरुद्ध दोन आणि सानूविरुद्ध तीन गुन्हे दाखलल आहेत. गुन्हा केल्यानंतर पळून गेलेल्या आरोपींना दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील डोंगरगावला जाऊन पोलिसांनी अटक केली. यातील अर्चित आणि प्रशांत फरार आहेत.
पहिल्यांदाच डबल धमाका
एकाच वेळी दोन टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. वारंवार गुन्हे करीत असल्याने समाजात दहशत असल्याचे लक्षात घेता या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे डॉ. वारके यांनी पत्रकारांना सांगितले.