सिमरन एकतर्फी प्रेमाचा बळी
By Admin | Updated: November 24, 2014 03:29 IST2014-11-24T03:29:55+5:302014-11-24T03:29:55+5:30
एकतर्फी प्रेम करणारा प्रियकर, त्याच्याबरोबर प्रेमासाठी दबाव टाकणारे मित्र-मैत्रीण यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून १४वर्षीय मुलीने आत्महत्येचा पर्याय निवडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

सिमरन एकतर्फी प्रेमाचा बळी
मनीषा म्हात्रे, मुंबई
एकतर्फी प्रेम करणारा प्रियकर, त्याच्याबरोबर प्रेमासाठी दबाव टाकणारे मित्र-मैत्रीण यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून १४वर्षीय मुलीने आत्महत्येचा पर्याय निवडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रियकर साहील शेख (१८) आणि मित्र कमलेश यादवसह (१८) एका १५वर्षीय मुलीला अटक करून मुलुंड पोलिसांनी तपास सुरू केला.
मुलुंड कॉलनी येथे आईवडिलांसमवेत राहणारी १४वर्षीय सिमरन केणी परिसरातील जय भारत हायस्कूलमध्ये दहावी (अ) वर्गामध्ये शिक्षण घेत होती. शाळेतीलच दहावी (ब)मध्ये तिची जिवलग मैत्रीण आयेशा (नाव बदलले आहे) शिक्षण घेते. गेल्या वर्षी या दोन्ही मैत्रिणींची ओळख साहील आणि कमलेशशी झाली. पहिल्या भेटीतच साहील सिमरनच्या प्रेमात पडला. तिची जिवलग मैत्रीण आयेशा हिनेही तिला साहीलला होकार देण्यासाठी गळ घातली. ते एकत्र फिरत असल्याचे तिच्या वडिलांना समजले होते. त्यानंतर त्यांनी तिला आणि साहीलला दमदेखील भरला होता. हळूहळू सिमरन साहीलला दूर राहण्याबाबत सांगत होती. त्यानंतर साहील एकतर्फी प्रेमातून आत्महत्या करण्याची धमकी देत तिला भेटण्याची जबरदस्ती करायला लागला. यात आयेशा आणि कमलेशही साहीलला भेटली नाहीस तर तो आत्महत्या करेल, म्हणून तिच्यावर दडपण आणत होते. साहीलला भेटण्यास टाळाटाळ करूनही साहील शाळेत येता-जाता तिचा मार्ग अडवायला लागला. त्यात आयेशा आणि कमलेश त्याचे निरोप तिच्यापर्यंत पोचवून तिला त्रास द्यायचे. त्यात या प्रकरणात घरी मिळणाऱ्या ओरड्यामुळे आणखीन भर पडत होती. यातून काहीच मार्ग न मिळाल्याने अखेर सिमरनने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक प्रकार तिच्या वडिलांनी दिलेल्या जबाबातून समोर आला. सिमरनच्या आत्महत्येच्या धक्क्याने आई बराच वेळ बेशुद्धावस्थेत होती. सिमरनच्या आईवर मुलुंडच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघा आरोपींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव यांनी दिली. आरोपींचे मोबाइल ट्रेसिंगला पाठविण्यात आले आहेत.
हातावरील एम कमलेशचा?
सिमरनच्या डाव्या हातावरील ‘आय हेट यू एम’ मधील ‘एम’ हा प्रियकराचा नसून, तिने लिहिलेल्या कमलेश नावामधील असल्याचे समोर आले. त्यातही त्याच्या शेजारी लिहिलेला आठ नंबरी मोबाइल
क्रमांकही कमलेशचाच असून, या प्रकरणात कमलेशचा काय संबंध आहे याचाही शोध पोलीस घेत आहेत.
बंद टेरेसवर संशयास्पद शूज?
सिमरनने ४.५०च्या सुमारास महावीर टॉवरमधील इमारतीत प्रवेश केल्याचे दिसते. त्या वेळी तिच्या पायात असलेले पांढऱ्या रंगाचे शूज तिच्या मृतदेहाजवळ नव्हते. त्यात पोलीस तपासात हे शूज बंद टेरेसवर सापडल्याने तिच्या आत्महत्येमागील संशय आणखीन बळावला आहे.