सोप्या भाषेतील इतिहासासाठी दुप्पट अभ्यास लागतो
By Admin | Updated: August 20, 2015 09:21 IST2015-08-20T00:43:40+5:302015-08-20T09:21:56+5:30
इतिहास सोपा करून सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दुप्पट अभ्यास करावा लागतो. तो करतानाच शिवरायांचा इतिहास तळागाळातील माणसापर्यंत; आईबहिणींच्या थेट गर्भापर्यंत

सोप्या भाषेतील इतिहासासाठी दुप्पट अभ्यास लागतो
मुंबई : इतिहास सोपा करून सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दुप्पट अभ्यास करावा लागतो. तो करतानाच शिवरायांचा इतिहास तळागाळातील माणसापर्यंत; आईबहिणींच्या थेट गर्भापर्यंत पोहोविण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग आपण केला, असे भावोद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी काढले.
राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्तरादाखल दिलेल्या भाषणात ते म्हणाले की, गीतेतील तत्त्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत सांगितले, तसेच ते गीताईद्वारे विनोबांनी सांगितले. मी इतका महान नाही, पण शिवकालिन इतिहास कपाटामध्ये, संशोधक-अभ्यासकांपर्यंत मर्यादित न राहता तळागाळातील माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केले.
आमच्या मायबहिणींच्या गर्भापर्यंत शिवरायांचा इतिहास पोहोचावा, याचा प्रयत्न आपण केला. ते सगळे जण आणि गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करणारे सर्वच ‘महाराष्ट्र भूषण’ आहेत, असे ते म्हणाले.
पुरंदरे हे केवळ ‘शिवशाहीर’ आहेत या आक्षेपावर थेट उत्तर देण्याऐवजी पुरंदरे यांनी आजवर केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडून ते म्हणाले की, पुस्तकात लिहिलेले, कागदपत्रात लपलेले किंवा भाषणातून सांगितलेले जे असेल तेच जर आपण कलेच्या माध्यमातून ललित पद्धतीने, पण अस्सल पुराव्यांसह मांडले तर तो इतिहास आपल्या मनाच्या गाभाऱ्यात अभंग राहतो, हा आपला अनुभव असल्याचे पुरंदरे म्हणाले. जगाच्या पाठीवर ऐन शिवकाळाशी संबंधित अनेक हस्तलिखितं, पत्र आणि इतरही कागदपत्रं अस्ताव्यस्त विखुरलेली आहेत. त्याबाबत आम्ही ऐकून आहोत. काही ठिकाणी ते धूळखात पडले आहे. काही जणांनी आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी आणि पालख्यांच्या सजावटीसाठी हे कागद वापरल्याचे आपल्या पाहण्यात आहे, अशी खंत बाबासाहेबांनी व्यक्त केली.
आपण ती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत पण शासनानेही त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मराठवाड्यातील लोकांचे
अश्रू पुसण्याचा निर्धार
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी आपण, आपले कुटुंबीय आणि सहकारी लवकरच आमच्या कुवतीनुसार काही करणार आहोत. तिथल्या बांधवांचे डोळे पुसणार आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.